पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात बैल ठार ,
वाकरला येथील घटना…
समीर बल्की | तालुका प्रतिनिधी चिमूर |
चिमूर तालुक्यातील वाकरला येथील शेतशिवारात रोड लगत झाडाखाली दोन बैल बांधून असताना एका बैलावर हल्ला करून व त्याला काही मीटर ओढत नेऊन ठार केले. ही घटना रात्री पहाटेच्या सुमारास घडली. त्यामुळे शेतकऱ्याचे ऐन हंगामामध्ये पन्नास हजार रुपये किमतीचा बैल वाघाच्या हल्ल्यात दगावल्याने मोठे नुकसान झाले. यामुळे पुन्हा आणखी याही वर्षी शेतशिवारात वाघाची दहशत निर्माण झाल्याने शेतकरी व शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वापरला येथील शेतकरी ईश्वर माळवे यांनी जवराबोडी ते वाकरला रोडवर असलेल्या आपल्या शेतातील झाडाखाली पावसाची कोणतीही शक्यता नसल्याने काल सायंकाळी बैलाला बांधून घरी आले. दुसऱ्या दिवशी सकाळी शेतावर गेले असता फक्त एकच बैल झाडाखाली बांधून असलेला दिसला. त्यामुळे दुसऱ्या बैलाचा शोध घेतला असता काही मीटरच्या अंतरावरच कापूस पिकाला लागून बैल हा वाघाने खाल्लेल्या अवस्थेत दिसून आला. याची माहिती शेजारील शेतकऱ्यांना दिली असता त्यांनी वनविभागाला घटनेची माहिती दिली. माहिती मिळतात भिशी येथील सहाय्यक वनक्षेत्र अधिकारी नैताम व वनरक्षक रेखा ढोके व इतर कर्मचारी घटनास्थळी हजर झाले. व घटनास्थळाच्या तिन्ही बाजूला ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले. आणि घटनास्थळाचा पंचनामा करून ठार झालेल्या बैलाचा दपन विधी करण्यात आला.
परिसरात पुन्हा सहा महिन्यानंतर कापसाचे पीक मोठे झाले असतानाच ही घटना घडल्याने शेतकऱ्यांमध्ये तसेच मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाने या वाघाचा बंदोबस्त तात्काळ करावा, व ईश्वर माळवे यांना बैलाची तात्काळ भरीव मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.








