मुखेड ला दुष्काळग्रस्त जाहीर करा ! काँग्रेससह महाविकास आघाडी आक्रमक,घंटानाद आंदोलन करत तहसीलदारांना दिले निवेदन.
बातमी सम्राट | मनोज बिरादार | मुखेड तालुका प्रतिनिधी | दि.२३/०९/२६/
तालुक्यात यंदा झालेल्या अत्यल्प पावसामुळे निर्माण झालेली भयानक दुष्काळी परिस्थिती पाहता मुखेड तालुका तात्काळ दुष्काळग्रस्त जाहीर करावा,यासह शेतकरी,विद्यार्थी,शेतमजूर आणि दिव्यांगांच्या विविध प्रलंबित मागण्या मंजूर कराव्यात,या मागणीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुखेडचे तहसीलदार यांच्यामार्फत काँग्रेस महाविकास आघाडीच्या वतीने घंटानाद आंदोलन करून जाहीर निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनात तालुक्यातील शेतकरी व नागरिकांच्या बिकट परिस्थितीकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे.पावसाअभावी हाताशी आलेली पिके पूर्णपणे करपून गेल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे.या गंभीर परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाने आंदोलकांच्या मागण्या तात्काळ मंजूर कराव्यात,अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.
मुखेड तालुका अधिकृतपणे दुष्काळग्रस्त घोषित करून बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी १ लक्ष रुपयांची तातडीची आर्थिक मदत द्यावी.
नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांना कोणत्याही किचकट अटींशिवाय पीक विम्याची रक्कम त्वरित मंजूर करावी.
चालू कर्जदार शेतकऱ्यांनाही थकीत कर्जदारांप्रमाणेच २ लक्ष रुपयांपर्यंत कर्जमाफी देऊन दिलासा द्यावा.
दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क पूर्णपणे माफ करावे.
पशुधन वाचवण्यासाठी तालुक्यात ठिकठिकाणी चारा छावण्या उभारण्यात याव्यात,तसेच मजुरांचे आणि बेरोजगारांचे स्थलांतर रोखण्यासाठी ‘रोहयो’अंतर्गत हाताला कामे उपलब्ध करून द्यावीत.
निराधार व दिव्यांग योजनेचे प्रलंबित अर्ज तातडीने निकाली काढून लाभार्थ्यांना मानधन सुरू करावे.
“शासनाने मुखेड तालुक्यातील या रास्त मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक आणि सकारात्मक विचार करून त्वरित ठोस निर्णय न घेतल्यास,येणाऱ्या काळात तालुक्यातील शेतकरी,शेतमजूर आणि नागरिक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील,” असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव डॉ.श्रावण रॅपणवाड,शिवसेना उपजिल्हाप्रमुख भालचंद्र नाईक,तालुका काँग्रेसचे अध्यक्ष राजीव पाटील रावणगावकर,शहराध्यक्ष हणमंत नारनाळीकर,शिवसेना उपतालुकाप्रमुख बालाजी काटशेव, युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश पाटील बेळीकर,युवक काँग्रेसचे सचिव तुकाराम पाटील सुडके,सेवादल काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विद्याधर अण्णा साखरे, प्रहार तालुकाध्यक्ष बालाजी राठोड,महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षा श्रीमती अरुणाताई तेलंग,ओबीसी काँग्रेस शहराध्यक्ष प्रकाश निमलवाड, युवक काँग्रेस तालुका उपाध्यक्ष एम.आर.गोपणर,जिल्हा काँग्रेस सरचिटणीस दिनेश आप्पा आवडके,शिवसेना महिला जिल्हा संघटीका सौ.सुनिताताई वडजे,शेकाप चे सल्लागार भाई पांडुरंग लंगेवाड,छावा तालुकाध्यक्ष गिरीधर पाटील केरुरकर,सोशल मिडिया काँग्रेस तालुकाध्यक्ष वैजनाथ तिपणे,फिशर काँग्रेस तालुकाध्यक्ष विठ्ठलराव पंदीलवाड, प्रताप पाटील सुडके,पत्रकार राजु बनसोडे,शहर काँग्रेस उपाध्यक्ष बालाजी वाडेकर,ॲड.ज्ञानेश्वर पाटील वडजे,श्रीराम वडजे,गौसभाई सलगरकर,नागेश स्वामी,इरफान मोमीन सावरगावकर सह पदाधिकारी उपस्थित राहून शासनाच्या विरोधात घंटानाद आंदोलन यशस्वी केले.
सदर निवेदनाच्या प्रति कृषी मंत्री दत्तात्रय भरणे,नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे,खासदार प्रा.रवींद्र चव्हाण,माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर आणि नांदेडचे जिल्हाधिकारी यांनाही माहिती व पुढील कारवाईसाठी पाठवण्यात आल्या आहेत.








