संत माऊली पतसंस्था घोटाळा; संचालकांना तातडीने अटक करून मालमत्ता जप्त करा!
तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे (EOW) वर्ग करण्याची आमदार प्राजक्त तनपुरे यांची मागणी
प्रतिनिधी : प्रमोद डफळ
चिचोंडी शिराळ : श्री संत माऊली अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या पाथर्डी, शेवगाव आणि नेवासा तालुक्यातील शाखा अचानक बंद झाल्याने शेकडो ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये तसेच तारण ठेवलेले सोन्याचे दागिने अडकले आहेत. या प्रकरणातील संबंधित संचालकांना तातडीने अटक करावी, संस्था व संचालकांची मालमत्ता कायदेशीर प्रक्रियेद्वारे जप्त करावी आणि संपूर्ण तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे (EOW) वर्ग करावा, अशी मागणी विधान परिषदेचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केली आहे.
याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे आमदार तनपुरे यांनी ऑनलाइन पत्रकार परिषदेत सांगितले.
पीडित ठेवीदारांच्या शिष्टमंडळासह आमदार तनपुरे यांनी अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन निवेदन सादर केले. प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता तपास तातडीने आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करावा, तसेच ठेवीदारांची रक्कम आणि तारण ठेवलेले सोने सुरक्षित राहावे यासाठी संबंधितांची मालमत्ता कायदेशीर प्रक्रियेद्वारे जप्त करण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली.
पोलीस अधीक्षकांनी या मागण्यांची गांभीर्याने दखल घेत तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याचे आमदार तनपुरे यांनी सांगितले.
शाखांच्या परवानगीचीही चौकशी करा
सहकार विभागाकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संस्थेचे मूलभूत कार्यक्षेत्र शेवगाव तालुक्यापुरते मर्यादित होते. असे असताना पाथर्डी आणि नेवासा तालुक्यात शाखा कोणत्या परवानगीच्या आधारे सुरू करण्यात आल्या, नियमांचे पालन झाले होते का, याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. या शाखांमधील व्यवहारांचे नियमित लेखापरीक्षण झाले होते का, याचीही सखोल चौकशी करण्याची मागणी आमदार तनपुरे यांनी केली.
सर्वसामान्यांची पुंजी संकटात
स्थानिक शेतकरी, कष्टकरी, लहान व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांनी विश्वासाने या संस्थेत आपली बचत जमा केली होती. अनेक खातेदारांनी आर्थिक गरजांसाठी सोन्याचे दागिने तारण ठेवले होते. शाखा अचानक बंद झाल्याने ठेवीदारांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले असून परिसरात चिंता व संतापाचे वातावरण आहे.
दिरंगाई झाल्यास आंदोलनाचा इशारा
“सर्वसामान्यांचे हक्काचे पैसे बुडू नयेत, यासाठी पोलीस व सहकार प्रशासनाने तात्काळ कठोर पावले उचलावीत. ठेवीदारांना त्यांचे पैसे व तारण ठेवलेले सोने परत मिळवून देण्यासाठी प्रशासनाने दिरंगाई केल्यास ठेवीदारांच्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले जाईल. — प्राजक्त तनपुरे, आमदार
शिष्टमंडळात मोठ्या संख्येने उपस्थिती
अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देताना शिराळचे सरपंच रवींद्र मुळे, सरपंच अंबादास डांबळे, अक्षय आव्हाड, डॉ. शिवाजी घोरपडे, सागर मुळे, माजी चेअरमन रामदास गोरे, गणेश तुपे, अमोल वाघ, अरुण पालवे, तुळशीदास पालवे, पाथरकर सर, अनिल गव्हाणे, सुमित पडोळे, श्रीराम खाडे यांच्यासह चिचोंडी शिराळ, तिसगाव, पाथर्डी व खरवंडी कासार परिसरातील बाधित खातेदार आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.








