किनवट शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट नागरिकांच्या जीविताला धोका !
“किनवट शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट नागरिक लहान मुले ज्येष्ठ नागरिकांसह दुचाकी स्वारांमध्ये भीतीचे वातावरण प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी.
बातमी सम्राट | मार्कंडेय सिरमवार | किनवट तालुका प्रतिनिधी |दि.२४/०९/२६/
किनवट : शहरातील विविध भागांमध्ये मोकाट कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, त्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. मोकाट कुत्र्यांच्या टोळ्या रस्त्यावर फिरताना दिसत असून, दुचाकीस्वारांच्या मागे धावणे, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांचा पाठलाग करणे, तसेच नागरिकांवर हल्ला करून चावा घेण्याच्या घटना घडत असल्याने शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
विशेषत सकाळी व सायंकाळच्या वेळेत रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना मोकाट कुत्र्यांचा सामना करावा लागत आहे. दुचाकीस्वारांच्या मागे अचानक कुत्रे धावत असल्याने वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात होण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना या कुत्र्यांपासून विशेष धोका निर्माण झाला आहे.
मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे. केवळ तात्पुरती कारवाई न करता मोकाट कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी नियोजनबद्ध व कायदेशीर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होण्यापूर्वी प्रशासनाने जागे होऊन मोकाट कुत्र्यांच्या समस्येवर तातडीने ठोस उपाययोजना करावी, अशी जोरदार मागणी किनवट शहरातील नागरिकांकडून होत आहे








