प्रतिनिधी: रोहित जोशी
संगमनेर :- “तुमच्यासाठी एमपीएससी-यूपीएससीची परीक्षा आहे, तर आमच्यासाठी निवडणुकीची परीक्षा आहे. तुम्ही अपयश स्वीकारून पुन्हा यश मिळवता, तसेच मीही लोकसभेच्या निवडणुकीतील पराभव स्वीकारल्यानंतर पुन्हा जनतेच्या आशीर्वादाने तुमच्यासमोर उभा आहे. प्रत्येकाच्या जीवनात संघर्ष असतो; मात्र सर्वसामान्य आणि गोरगरीब कुटुंबातील मुलांनी शिक्षणाच्या बळावर शासकीय सेवेत स्थान मिळवणे, यापेक्षा आनंदाचा दिवस माझ्या जीवनात दुसरा नाही,” असे प्रतिपादन भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.
संगमनेर तालुक्यातील भगवतीमाळ-खंदरमळा येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षा तसेच पोलीस भरतीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा जाहीर गौरव व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॉ. विखे पाटील बोलत होते. कार्यक्रमास आमदार अमोल भाऊ खताळ, महाराष्ट्र टाइम्सचे पुणे उपसंपादक तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशांत काशिनाथ आहेर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे नियोजन जनार्दन आहेर यांनी केले.
डॉ. विखे पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करताना सांगितले की, सामान्य कुटुंबातील मुलगा किंवा मुलगी शिक्षण घेऊन मोठ्या पदावर पोहोचते, तेव्हा त्यांचा गौरव करणे आनंदाची बाब आहे. स्वप्न पाहण्याचे धाडस आणि ते पूर्ण करण्यासाठी केलेला संघर्ष सोपा नसतो. आज संघर्ष करून अधिकारी झालेली हीच मुले भविष्यात मोठ्या पदांवर पोहोचतील आणि त्याचा फायदा केवळ त्यांच्या कुटुंबाला नव्हे, तर संपूर्ण गावाला व समाजाला होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि सुविधा मिळणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. गरीब व सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी मदत मिळावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून दरवर्षी निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
यासोबतच संगमनेर तालुक्यातील शाळांच्या पायाभूत सुविधांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे डॉ. विखे पाटील यांनी नमूद केले. शाळांच्या खोल्या, संगणक, डिजिटल बोर्ड, मुलींसाठी स्वच्छतागृहे आणि शुद्ध पाण्याची सुविधा या मूलभूत गरजा असून विद्यार्थ्यांचा पाया मजबूत करण्यासाठी या सुविधांवर भर दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.
“आपली मुले शिकवा, मुलींना शिकवा आणि त्यांना समान संधी द्या. सरपंच एकच होणार, आमदार एकच होणार, खासदारही एकच होणार; मात्र आपल्या मुलांच्या शिक्षणातून निर्माण होणारे यश अनेक पिढ्यांना पुढे नेते,” असे सांगत डॉ. विखे पाटील यांनी पालकांना शिक्षणाला प्राधान्य देण्याचे आवाहन केले. राजकारणासाठी कर्जबाजारी होण्यापेक्षा मुलांच्या शिक्षणासाठी आणि आई-वडिलांच्या कल्याणासाठी खर्च करण्यास प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी आमदार अमोल भाऊ खताळ यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. स्पर्धा परीक्षांमधील यश एका दिवसात मिळत नसून त्यासाठी सातत्यपूर्ण मेहनत, योग्य नियोजन आणि अपयशातून शिकण्याची तयारी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी मिळालेल्या यशावर थांबू नये, तर पुढील ध्येय निश्चित करून त्यासाठी प्रयत्नशील राहावे आणि आपल्या यशातून कुटुंबासह गावाचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, परिसरातील सबस्टेशनच्या प्रश्नावरही डॉ. विखे पाटील यांनी भाष्य केले. “मला खोटे आश्वासन देता येत नाही. जे शक्य आहे त्याला ‘हो’ आणि जे शक्य नाही त्याला स्पष्ट ‘नाही’ सांगणे, हीच माझी कार्यपद्धती आहे. एकदा ‘हो’ म्हटल्यानंतर ते काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे ही माझी भूमिका आहे,” असे सांगत सबस्टेशनचा प्रश्न एका वर्षात मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
कार्यक्रमात एमपीएससी, विविध स्पर्धा परीक्षा तसेच पोलीस भरतीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशामुळे भगवतीमाळ-खंदरमळा आणि पंचक्रोशीतील शैक्षणिक वातावरणाला प्रोत्साहन मिळाले. कार्यक्रमास ग्रामस्थ, महिला, विद्यार्थी, पालक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.








