शाळेच्या परिसरात बिबट्याचा मुक्त संचार ; विद्यार्थ्यांमध्ये भितीचे वातावरण !
बातमी सम्राट | संदीप जाधव | टाकळी भान प्रतिनिधी | दि.०७/१०/२०२६/
टाकळीभान : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खंडोबा वस्ती, टाकळीभान परिसरात बिबट्याचा वारंवार मुक्त संचार होत असल्याने शालेय विद्यार्थी, पालक तसेच ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
खंडोबा वस्ती परिसरात मोठ्या प्रमाणावर ऊस शेती, झाडी-झुडपे तसेच विविध शेती पिके असल्याने बिबट्याला लपण्यासाठी व निवाऱ्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरात बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
बिबट्याच्या हालचालींमुळे पालकांमध्येही चिंतेचे वातावरण असून, विद्यार्थ्यांना शाळेत पाठविताना पालकांकडून सुरक्षिततेची विशेष काळजी घेतली जात आहे. शालेय व्यवस्थापनाच्या वतीने विद्यार्थी व पालकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, एखादी अनुचित अथवा दुर्दैवी घटना घडण्यापूर्वी वन विभागाने तातडीने या परिसराची पाहणी करून बिबट्याचा बंदोबस्त करावा, तसेच नागरिक व विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेले भीतीचे वातावरण दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी खंडोबा वस्ती परिसरातील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.








