मुखेडच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव; संस्थापक ज्ञानोबा जोगदंड व प्राचार्य जगदीप ज्ञानोबा जोगदंड यांनी स्वीकारला पुरस्कार
मुखेड प्रतिनिधी : शहरासह पंचक्रोशीत गुणवत्तापूर्ण शिक्षण, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या जिजाऊ ज्ञानमंदिर सेमी इंग्लिश स्कूल, मुखेडला ‘बेस्ट स्कूल ऑफ द इयर–२०२६’ या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
स्टार एज्युकेशन अवॉर्ड्स २०२६च्या वतीने मंगळवार, ६ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबई येथील NESCO बॉम्बे एक्झिबिशन सेंटर, गोरेगाव पूर्व येथे आयोजित भव्य पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी संस्थापक श्री. ज्ञानोबा जोगदंड व प्राचार्य तथा सचिव श्री. जगदीप ज्ञानोबा जोगदंड यांनी पुरस्कार स्वीकारला.
‘विद्या भवती विनयम्’ या संस्कारमूल्याला केंद्रस्थानी ठेवून जिजाऊ ज्ञानमंदिरने गेल्या २० वर्षांच्या शैक्षणिक वाटचालीत गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संस्कार, नैतिक मूल्ये, आत्मविश्वास आणि सामाजिक बांधिलकी रुजविण्याचे कार्य केले आहे. उत्कृष्ट शैक्षणिक निकाल, विद्यार्थ्यांची सातत्यपूर्ण प्रगती, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि सर्वांगीण विकासाच्या माध्यमातून शाळेने मुखेडच्या शैक्षणिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविला आहे.
शाळेतील अनेक विद्यार्थी आज IIT इंजिनिअर, डॉक्टर, प्रशासकीय अधिकारी तसेच विविध प्रतिष्ठित क्षेत्रांत यशस्वीपणे कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांचे हे यश हीच शाळेची खरी कमाई असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.
या यशामागे संस्थापक श्री. ज्ञानोबा जोगदंड यांची दूरदृष्टी, प्राचार्य तथा सचिव श्री. जगदीप ज्ञानोबा जोगदंड यांचे प्रभावी नेतृत्व, कोषाध्यक्ष श्री. जगदीश जोगदंड यांची शाळेविषयीची तळमळ, पर्यवेक्षक श्री. सुधाकर जोगदंड यांचे सुनियोजित मार्गदर्शन, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे परिश्रम, विद्यार्थ्यांची मेहनत आणि पालकांचा शाळेवरील दृढ विश्वास यांचा मोलाचा वाटा आहे.
> “जगी जीवनाचे सार, घ्यावे जाणुनी सत्वर ।
जैसे ज्याचे कर्म तैसे, फळ देतो रे ईश्वर ॥”
या उक्तीप्रमाणे प्रामाणिकपणे केलेल्या शैक्षणिक कार्याची मिळालेली ही पावती असून, ‘बेस्ट स्कूल ऑफ द इयर–२०२६’ हा पुरस्कार संपूर्ण जिजाऊ ज्ञानमंदिर परिवाराच्या सामूहिक परिश्रमाचा गौरव असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
या पुरस्काराबद्दल जिजाऊ ज्ञानमंदिर सेमी इंग्लिश स्कूल, मुखेडचे संस्थापक, प्राचार्य, शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.








