NCMC कार्डासाठी ₹१९९ ऐवजी ₹२५० मागितल्याचा आरोप; मोफत आधार नोंदणीसाठीही पैसे आकारल्याची तक्रार
राहुरी | प्रतिनिधी : दिनेश गायकवाड
राहुरी शहरातील एका आधार व एस.टी. महामंडळाच्या NCMC (National Common Mobility Card) कार्ड केंद्रावर ग्राहकांकडून जादा शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. एस.टी. महामंडळाचे NCMC कार्ड काढण्यासाठी ₹१९९ ऐवजी ₹२५० मागितले जात असल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे. तसेच, आधार कार्डची नवीन नोंदणी पूर्णपणे मोफत असतानाही त्यासाठी पैसे घेतले जात असल्याची तक्रार समोर आल्याने महिला व सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
संबंधित केंद्रावर गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू असल्याचे काही ग्राहकांचे म्हणणे आहे. विविध कामांसाठी केंद्रावर येणाऱ्या नागरिकांकडून निर्धारित शुल्कापेक्षा अधिक रक्कम मागितली जात असल्याच्या तक्रारी आहेत. विशेष म्हणजे, नवीन आधार नोंदणी मोफत असताना त्यासाठी पैसे आकारले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकाराची संबंधित विभागाने गांभीर्याने दखल घेऊन चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
एका महिला ग्राहकाने NCMC कार्डाच्या शुल्काबाबत केंद्र चालकाकडे विचारणा केली असता, तिला अरेरावीची वागणूक दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित महिलेने ₹१९९ ची पावती दाखवून, “मला ₹१९९ ची पावती दिली आहे, मग आता ₹२५० रुपये का मागत आहात?” असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर केंद्र चालकाने कथितरीत्या, “तुम्हाला जे करायचे ते करा; नाहीतर पावती इथे ठेवून जा, पावती देणार नाही,” अशा शब्दांत उत्तर दिल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे ग्राहकांशी योग्य वागणूक दिली जाते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मोफत आधार नोंदणीसाठी पैसे कशासाठी?
आधार कार्डची नवीन नोंदणी मोफत असताना त्यासाठी पैसे आकारले जात असल्याचा आरोप गंभीर आहे. तसेच, एस.टी. महामंडळाच्या NCMC कार्डासाठी जादा शुल्क घेतले जात असल्याच्या तक्रारींचीही चौकशी होणे आवश्यक आहे. संबंधित विभागाने केंद्राच्या कामकाजाची तपासणी करून नियमांचे उल्लंघन आढळल्यास नियमानुसार कारवाई करावी आणि ग्राहकांची होणारी कथित आर्थिक पिळवणूक थांबवावी, अशी मागणी होत आहे.
संबंधित विभाग या तक्रारींची दखल घेऊन चौकशी करणार का? मोफत आधार नोंदणीसाठी पैसे आकारले जात असल्याच्या आरोपांची सत्यता तपासली जाणार का? तसेच, NCMC कार्डाच्या शुल्काबाबतच्या तक्रारींवर कारवाई होणार का, असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.








