साकेगाव येथे तरुणावर जीवघेणा हल्ला, आरोपीस तात्काळ अटक
रायपूर :सागर इंगळे
रायपूर, जि. बुलढाणा : दि. २६ ऑगस्ट २०२६, साकेगाव येथील शंकर पुंडलिक नाडे या तरुणावर दिनांक २४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी सुमारे ०९.३० वाजता हल्ला झाल्याची माहिती पोलीस स्टेशन रायपूर यांना प्राप्त झाली.
सदर घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक तथा ठाणेदार पोलीस स्टेशन रायपूर निलेश सोळंके यांनी पोलीस अंमलदारांसह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी परिस्थितीचा आढावा घेत प्राथमिक चौकशी केली. तसेच जखमी शंकर पुंडलिक नाडे यांच्याकडून घटनेबाबत माहिती घेऊन पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात आली.
प्राथमिक तपासात महादेव भिकाजी भालेराव याच्याकडून शंकर नाडे यांच्यावर हल्ला झाल्याचे समोर आल्याने पोलिसांनी तात्काळ कारवाई करून त्यास ताब्यात घेतले. त्यानंतर जखमी शंकर नाडे यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन रायपूर येथे भारतीय न्याय संहिता (BNS) मधील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी महादेव भिकाजी भालेराव यास अटक करण्यात आली आहे.
सदर घटनेचे नेमके कारण, हल्ल्याचा प्रकार, हल्ल्यामध्ये वापरण्यात आलेले शस्त्र, आरोपीचा पूर्वइतिहास इत्यादी तपास सुरू आहे.
घटना घडल्यानंतर पोलिसांनी केलेली तात्काळ घटनास्थळावरील कार्यवाही व आरोपीस केलेली अटक यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने पोलिसांची तत्परता दिसून आली आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता घटनेबाबतची अधिकृत माहिती पोलिसांकडूनच घ्यावी, असे आवाहन पोलीस स्टेशन रायपूर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
सदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस अधीक्षक, बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक तथा ठाणेदार निलेश सोळंके यांच्या नेतृत्वाखाली पोहेकॉ दशरथ शितोळे, पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण शिंदे, राहुल जाधव, अनंत कळमकर व गजानन मोरे करीत आहेत.








