नगर-शिर्डी महामार्ग दुरुस्तीसाठी संजय काळे यांच्या अर्धनग्न आंदोलनाला राहुरीकरांचा उत्स्फूर्त पाठिंबा!
प्रतिनिधी : दिनेश गायकवाड
राहुरी :गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आणि दुरवस्थेत असलेल्या नगर-शिर्डी महामार्गाच्या तातडीने दुरुस्तीसाठी कोपरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी पुकारलेल्या अर्धनग्न पायी आंदोलनाला राहुरी शहर व परिसरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. शनिवारी (दि. २९ ऑगस्ट) हे आंदोलन राहुरी शहरात पोहोचले असता, स्थानिक नागरिक, व्यापारी व रस्ता दुरुस्त कृती समितीच्या सदस्यांनी आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवत काळे यांच्या भूमिकेला जोरदार पाठिंबा दर्शवला.
सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी २५ ऑगस्ट २०२६ रोजी शिर्डी ते अहिल्यानगर असा अर्धनग्न पायी प्रवास करत या आंदोलनाला सुरुवात केली आहे. नगर-शिर्डी रस्त्यासाठी आजवर शेकडो कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला; मात्र अधिकारी आणि ठेकेदारांच्या संगनमतामुळे कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट राहिला आहे. या महामार्गासाठी शेकडो वर्षे जुनी झाडे तोडण्यात आली, पण पुन्हा नवीन झाडे लावली गेली नाहीत आणि रस्ताही नीट झाला नाही. “शासनाच्या या कारभारामुळे नागरिक अक्षरशः नागवले गेले आहेत; म्हणूनच आम्ही अर्धनग्न होऊन शासनाचा निषेध नोंदवत आहोत,” असा थेट इशारा या वेळी काळे यांनी दिला.
शनिवारी हे आंदोलन राहुरी शहरात दाखल झाल्यानंतर रस्ता दुरुस्त कृती समितीचे सदस्य, व्यापारी आणि नागरिकांनी काळे यांचे स्वागत करून आंदोलनाला पाठिंबा दिला. महामार्गाच्या दुरवस्थेमुळे दैनंदिन अपघातांची संख्या वाढली असून प्रवाशांचे आणि सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत असल्याने लवकरात लवकर दर्जेदार काम पूर्ण करावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
या प्रसंगी रस्ता दुरुस्त कृती समितीचे देवेंद्र लांबे, संजय देशपांडे, सुनील विश्वासराव, नवनीत दरक, सतीश घुले, संदीप गाडे, ॲड. देवेंद्र गाडे, ॲड. अमोल शेळके, ॲड. अमोल डौले, ॲड. सुहास तोडमल, ओंकार दरक, डॉ. श्रीकांत कुलकर्णी, डॉ. शुभा कुलकर्णी, इंजि. अनंत शेळके, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पारख, अशोक कदम, संतोष भुजाडी, जनार्दन म्हसे, सागर राठी, प्रितेश तनपुरे, अविनाश शिंदे यांच्यासह परिसरातील नागरिक व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नगर-शिर्डी रस्त्यावरील खड्ड्यांना पुष्पहार अर्पण करून ‘गांधीगिरी’!
खड्ड्यांची झाली आरती! राहुरीत आंदोलन दाखल झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांच्या हस्ते नगर-शिर्डी महामार्गावरील भव्य खड्ड्यांना पुष्पहार घालून अनोख्या पद्धतीने ‘गांधीगिरी’ आंदोलन करण्यात आले. प्रशासनाला आणि ठेकेदाराला जाग आणण्यासाठी खड्ड्यांना हार घालताना उपस्थितांनी जोरदार घोषणाबाजी केली. “शासकीय अधिकारी आणि ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे आज रस्त्याची ही भयानक अवस्था झाली आहे, त्यामुळे या खड्ड्यांचाच सत्कार करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे,” असा टोला या वेळी रस्ता दुरुस्त कृती समितीचे देवेंद्र लांबे यांनी लगावला. या अनोख्या आंदोलनाने उपस्थितांचे व प्रवाशांचे विशेष लक्ष वेधून घेतले.








