किनवट–निर्मल मार्गावर सकाळी संध्याकाळी नवीन बस फेरी सुरू करण्याची मागणी आगार प्रमुखांना निवेदन
प्रतिनिधी – मार्कंडेय सिरमवार
किनवट : किनवट तालुका आणि लगतच्या तेलंगणा राज्यातील निर्मल, निजामाबाद, करीमनगर, आर्मूर व मेटपल्ली या भागांत स्थानिक नागरिकांचे मोठे सामाजिक, कौटुंबिक व व्यापारी नातेसंबंध आहेत. मात्र, सध्या या मार्गावर बसच्या वेळेअभावी प्रवाशांचे हाल होत असून, किनवट आगाराने सकाळी 07:00 वाजता किनवट ते निर्मल आणि सायंकाळी 07:00 वाजता निर्मल ते किनवट परतीची फेरी ही नवीन बस सेवा तातडीने सुरू करावी, या मागणीचे निवेदन आगार प्रमुख, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ किनवट यांना सादर करण्यात आले.
सध्या निर्मल डेपोची बस किनवटवरून सकाळी 10:00 वाजता सुटते आणि दुपारी 01:00 वाजता निर्मल येथे पोहोचते. तर निर्मल येथून परतीची शेवटची बस दुपारी 3:00 वाजताच असल्याने प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालय, कौटुंबिक किंवा व्यापारी कामांसाठी अवघा 2 तासांचा वेळ मिळतो. यामुळे एकाच दिवसात कामे उरकून परतणे अशक्य होत आहे. यापूर्वी निर्मल डेपोची रात्री मुक्कामी राहणारी सकाळी 6:00 वा. ची बस गेल्या 6 महिन्यांपासून बंद असल्याने ही अडचण अधिक तीव्र झाली आहे.
मागणीनुसार प्रस्तावित वेळापत्रक: किनवट ते निर्मल: सकाळी 07:00 वाजता निर्मल ते किनवट परतीची फेरी सायंकाळी 07:00 वाजता करण्यात यावी अशी मागणी होत आहे. किनवट आगाराने स्वतःची बस या वेळेत सुरू केल्यास वैद्यकीय उपचारासाठी जाणारे रुग्ण, व्यापारी, नातेवाईक व सर्वसामान्य प्रवाशांची मोठी सोय होईल. एकाच दिवसात कामे पूर्ण करून परतणे शक्य होईल, तसेच यामुळे किनवट आगाराच्या उत्पन्नात देखील मोठी वाढ होईल, असा विश्वास निवेदनात व्यक्त करण्यात आला आहे.
हे निवेदन सामाजिक कार्यकर्ते संजय पोचिराम बोलेनवार रा. साठेनगर, किनवट अजय जाधव, रोडे तसेच संंजु मुरगुलवार, राजु मुरगुलवार, संदीप चनमनवार, जमिल जाधव, नरेंद्र माहुरकर, रोशना बंडेवार, विठ्ठल पवार, राजेश बोलिनवार, अशोक आरपल्लीवार, शंकर सावनपल्लीवार, स्वामी लुमपल्लीवार, राकेश उपारपवार, दुर्गादास मडेवार, जिंदर पोपटपोटा, मनोज चनमनवार, अभ्यंक कयापाक रिंकु हलवले आणि ॲड. विजय काळे यांच्यासह अनेक नागरिकांच्या स्वाक्षरीसह आगार प्रमुखांकडे सुपूर्द करण्यात आले.आहे








