शिर्डीत तरुणाच्या कमरेला देशी कट्टा २५ हजारांचे बेकायदा शस्त्र जप्त; साहिल खंडीझोड जेरबंद
प्रतिनिधी :रोहित जोशी
शिर्डी: अवैध शस्त्र बाळगून परिसरात दहशत निर्माण करण्याच्या प्रयत्नांना शिर्डी पोलिसांनी चांगलाच चाप लावला आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी कोपरगाव तालुक्यातील वेस येथे धडक कारवाई करत साहिल सुखदेव खंडीझोड (वय २२) या तरुणाला बेकायदेशीर देशी कट्ट्यासह अटक केली. त्याच्याकडून सुमारे २५ हजार रुपये किमतीचा देशी कट्टा जप्त करण्यात आला आहे.
शिर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध शस्त्रांची विक्री, बाळगणूक आणि वापर रोखण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. याचदरम्यान पोलीस उपनिरीक्षक सागर काळे यांना साहिल खंडीझोड याच्याकडे विनापरवाना देशी कट्टा असल्याची गुप्त माहिती मिळाली. माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक काळे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने पंचांसमक्ष वेस येथे त्याच्या घरी झडती घेतली. झडतीदरम्यान पोलिसांना देशी कट्टा आढळून आला. पोलिसांनी तत्काळ तो ताब्यात घेत साहिल खंडीझोड याला अटक केली. जप्त केलेल्या देशी कट्ट्याची किंमत सुमारे २५ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ मधील कलम ३, ५, २५ तसेच ७ व २७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीकडे हे शस्त्र कोठून आले, त्याचा वापर कोणत्या कारणासाठी केला जाणार होता तसेच या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.








