शिक्षकांनी सेवापूर्तीनंतर आरोग्य सांभाळून कुटुंबासोबत समाजाची सेवा करावी – बापूसाहेब डोके
शिक्षिका मंजुळा नवगिरे यांचा सेवापूर्तीनिमित्त गौरव
प्रतिनिधी : दिगंबर बोडखे
आष्टी – शिक्षक हा केवळ विद्यार्थ्यांना ज्ञान देणारा घटक नसून समाजाची भावी पिढी घडविण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडणारा घटक आहे. सेवाकाळात विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी प्रामाणिकपणे योगदान देणाऱ्या शिक्षकांनी सेवापूर्तीनंतरही आपला प्रदीर्घ अनुभव समाजाच्या उपयोगी आणावा असे प्रतिपादन असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बापूसाहेब डोके यांनी केले.
अहिल्या नगर येथील निर्मल नगरच्या लक्ष्मीबाई शांताराम डोके विद्यालयाच्या शिक्षिका सौ. मंजुळा नवगिरे यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरुन बापुसाहेब डोके बोलत होते.
यावेळी संस्थेच्या सचिव आशादेवी डोके, संचालक महेश डोके, आकाशा त्र्यंबके यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. संस्थेचे अध्यक्ष बापुसाहेब डोके व सचिव सौ. आशादेवी डोके यांच्या हस्ते सौ. मंजुळा नवगिरे यांचा सत्कार करण्यात आला.
पुढे बोलताना बापुसाहेब डोके यांनी सांगितले की, सेवापूर्ती म्हणजे कार्याचा शेवट नसून जीवनाच्या नव्या पर्वाची सुरुवात आहे. त्यामुळे आता स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत कुटुंबासोबत आनंदी जीवन जगावे आणि अनुभवाच्या माध्यमातून समाजसेवेत योगदान द्यावे. शिक्षकांचे कार्य हे समाजाच्या भवितव्याशी जोडलेले असते. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात आणि त्यांना योग्य दिशा देण्यात शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. सेवाकाळात शिक्षक आपल्या ज्ञान, अनुभव आणि संस्कारांच्या माध्यमातून असंख्य विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी सुनील क्षत्रे, सोनम, आशा धामणे, संजोग बर्वे, सुजाता कर्डीले, ज्योती पवार, राणी राऊत, अभिषेक खामकर, किरण जाधव, सॉलोमन क्षेत्रे, तन्मय अर्पण आदींसह कुटुंबीय उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंदाकिनी पांडुळे यांनी केले. उपस्थितांचे आभार रिबेका क्षेत्रे यांनी मानले. विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








