प्रा.डॉ. प्रशांत विघे यांच्या कर्तृत्वावर राज्याची मोहोर
‘डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार’ जाहीर; शिक्षकदिनी होणार सन्मान’
भारतीय विद्या मंदिर, अमरावतीद्वारा संचालित भारतीय महाविद्यालय, अमरावती येथील राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. प्रशांत विश्वेश्वरजी विघे यांची सन २०२५-२६ या वर्षासाठी महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण संचालनालयातर्फे प्रदान करण्यात येणाऱ्या ‘डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कारासाठी’ निवड झाली आहे. उच्च शिक्षण क्षेत्रात गेल्या दोन दशकांपासून त्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण, उल्लेखनीय आणि विधायक कार्याची राज्यस्तरावर दखल घेत त्यांच्या कर्तृत्वावर शासनाची मोहोर उमटली आहे. येत्या शिक्षक दिनाच्या औचीत्यावर महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि इतर मान्यवर मंडळी यांच्या उपस्थित त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
उच्च शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या शिक्षकांचा यथोचित गौरव करण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. राज्यस्तरावर प्रदान केला जाणारा हा पुरस्कार शिक्षण क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेचा सन्मान मानला जातो. विविध संवर्गांतून प्रतिवर्षी ३१ पुरस्कारार्थींची निवड करण्याची तरतूद असून, प्रत्येक पुरस्कारार्थीस २५ हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात येते. यावर्षी महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील १२ सार्वजनिक विद्यापीठांच्या कार्यक्षेत्रातील शासकीय, अशासकीय अनुदानित, कायम विनाअनुदानित महाविद्यालये, संस्था, अध्यापक महाविद्यालये तसेच समाजकार्य महाविद्यालयांतील शिक्षक संवर्गातून डॉ. प्रशांत विघे यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. प्रा. डॉ. प्रशांत विघे गेल्या २० वर्षांपासून उच्च शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून अध्यापनासोबतच संशोधन, लेखन, विद्यार्थी मार्गदर्शन, शैक्षणिक उपक्रम, संघटनात्मक कार्य आणि विद्यापीठीय प्रशासन या विविध क्षेत्रांत त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे. अध्यापन हा केवळ नोकरीचा भाग न मानता विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासोबतच त्यांच्या वैचारिक जडणघडणीला त्यांनी सातत्याने प्राधान्य दिले. विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती, संविधानिक मूल्ये आणि सामाजिक जाणीव वृद्धिंगत व्हावी, यासाठी त्यांनी विविध उपक्रम राबविले. राज्यशास्त्र विषयाच्या अभ्यासपूर्ण अध्यापनासोबतच सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक प्रश्नांकडे चिकित्सक दृष्टीने पाहण्याची भूमिका त्यांनी जोपासली.
अमरावती विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणे आणि समित्यांमध्ये प्राध्यापक म्हणून त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला असून शिक्षक, विद्यार्थी आणि उच्च शिक्षणाशी संबंधित विविध प्रश्न विद्यापीठीय व्यासपीठावर मांडण्याचे कार्य केले आहे. सन २०२२ पासून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य म्हणून ते कार्यरत आहेत. या माध्यमातून उच्च शिक्षणातील बदल, शिक्षकांच्या समस्या, विद्यार्थ्यांचे प्रश्न, शैक्षणिक धोरणे आणि विद्यापीठीय प्रशासनाशी संबंधित विविध विषयांवर त्यांनी सातत्याने भूमिका मांडली आहे. त्यामुळे विद्यापीठीय क्षेत्रातील त्यांचा सहभाग केवळ औपचारिक न राहता प्रश्नांची मांडणी, पाठपुरावा आणि त्यावरील उपाययोजनांशी जोडलेला राहिला आहे. प्रा. डॉ. प्रशांत विघे यांची ओळख केवळ प्राध्यापक म्हणून मर्यादित नसून लेखक, संशोधक, संशोधन मार्गदर्शक तसेच अभ्यासू आणि वैचारिक मांडणी करणारे वक्ते म्हणूनही त्यांनी आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. भारतीय राज्यघटना, लोकशाही, निवडणूक प्रक्रिया, शिक्षणव्यवस्था, उच्च शिक्षण, शिक्षकांचे प्रश्न आणि समकालीन राजकारण अशा विविध विषयांवर त्यांचे सातत्याने लेखन आणि व्याख्याने होत असतात. राज्यातील विविध वृत्तपत्रे व माध्यमांमधून सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय विषयांवरील त्यांचे लेखन प्रसिद्ध झाले आहे.
या विविधांगी कार्याची दखल घेत त्यांना यापूर्वीही शैक्षणिक, संशोधन आणि लेखन क्षेत्रातील विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या दोन दशकांच्या अध्यापन, संशोधन, लेखन, विद्यार्थी मार्गदर्शन आणि विद्यापीठीय कार्याची पावती म्हणून उच्च शिक्षण संचालनालयातर्फे जाहीर झालेला ‘डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार’ हा त्यांच्या शैक्षणिक प्रवासातील आणखी एक मानाचा टप्पा ठरला आहे. प्रा. डॉ. प्रशांत विघे यांच्या निवडीमुळे भारतीय महाविद्यालय, अमरावतीच्या शैक्षणिक लौकिकात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या निवडीबद्दल संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, संशोधक, माजी विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. अमरावतीच्या शैक्षणिक क्षेत्रातून राज्यस्तरीय प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी झालेली ही निवड केवळ एका शिक्षकाचा गौरव नसून सातत्यपूर्ण अध्यापन, अभ्यास, संशोधन, लेखन आणि शैक्षणिक बांधिलकीचा सन्मान असल्याची भावना व्यक्त होत आहे. या सन्मानामुळे भारतीय महाविद्यालयासह अमरावतीच्या उच्च शिक्षण क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे








