विज्ञान सेमिनारमध्ये जय बाबाजी स्कूल जिल्ह्यात प्रथम; राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सलग दुसऱ्यांदा निवड
प्रतिनिधी : लक्ष्मण घुगे
नगरसुल तालुका येवला येथील जय बाबाजी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली.जिल्हास्तरीय विज्ञान मेळाव्यातील विज्ञान सेमिनारमध्ये उत्कृष्ट सादरीकरण करत शाळेने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला असून,राज्यस्तरीय विज्ञान सेमिनारसाठी सलग दुसऱ्यांदा निवड होण्याचा बहुमान मिळविला आहे.
जिल्हास्तरीय विज्ञान मेळाव्यात‘भारतीय ऊर्जा क्षेत्र २०४७–आव्हाने आणि संधी’या विषयावर विद्यार्थ्यांनी अभ्यासपूर्ण,तर्कशुद्ध व प्रभावी मांडणी केली.भारताच्या भविष्यातील वाढत्या ऊर्जेच्या गरजा,नवीकरणीय ऊर्जा स्रोत,ऊर्जा बचत, आधुनिक तंत्रज्ञान,ऊर्जा स्वावलंबन तसेच ऊर्जा क्षेत्रातील आव्हाने व संधी यांचा विद्यार्थ्यांनी सखोल अभ्यास करून विषयाची प्रभावी मांडणी केली.
विद्यार्थ्यांचे विषयाचे आकलन,वैज्ञानिक दृष्टिकोन, अभ्यासपूर्ण मांडणी,वक्तृत्वशैली आणि प्रभावी सादरीकरण यांचे परीक्षकांनी विशेष कौतुक केले. उत्कृष्ट सादरीकरणाच्या जोरावर विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड करण्यात आली आहे.
मागील वर्षीदेखील जय बाबाजी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यात नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले होते.यंदा सलग दुसऱ्यांदा राज्यस्तरावर निवड होऊन शाळेने विज्ञान क्षेत्रातील यशाची परंपरा कायम राखली आहे.
या विज्ञान मेळाव्यास मविप्र चे चिटणीस दिलीप दळवी,नाशिक जिल्हा विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष विनीत धर्मराज पवार,किशोर जाधव,डॉ. प्रशांत सूर्यवंशी,कार्यवाहक कल्पेश चव्हाण, रमाकांत भामरे,योगेश जाधव,सुभाष सोनवणे, दत्तात्रेय ह्याळीज,दादाजी आहिरे,डॉ.डी.के. आहेर,डॉ.गणेश मोगल,डॉ. संगिता रत्नपारखी, ओम शांती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राम जाधव,येवला तालुका अध्यापक संघाचे अध्यक्ष संग्राम सानप,संतोष तेलपुरे,संकेत मोकळ,क्षितिज व नकिल आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांची जिद्द व मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन,पालकांचे सहकार्य आणि संस्थेचे सातत्यपूर्ण प्रोत्साहन यांचा मोलाचा वाटा आहे.या यशामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला असून,राज्यस्तरावर शाळेचे,पालकांचे व नगरसूलचे नाव उज्ज्वल करण्याची नवी प्रेरणा त्यांना मिळाली आहे. यशस्वी विद्यार्थी व विद्यालयाचे सर्व स्थरातून अभिनंदन होत आहे.
फोटो -नाशिक-जिल्हा स्थरीय विज्ञान मेळाव्यात जिल्हात प्रथम पारितोषिक मिळविलेल्या जयबाबाजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतांना मान्यवर.








