दौलापुरात शेतकऱ्यांच्या नावावर विहिरीची बिले उचलल्याचा आरोप!
निवेदन देताच चौकशीची मागणी; प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष
प्रतिनिधी/ गंगाधर कांबळे.
बिलोली : तालुक्यातील दौलापुर येथे काही शेतकऱ्यांच्या नावावर त्यांच्या पूर्वपरवानगी अथवा माहितीशिवाय विहिरीचे काम मंजूर करून त्याची बिले उचलण्यात आल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणी संबंधित शेतकऱ्यांनी एकत्र येत प्रशासनाकडे निवेदन सादर करून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. यासोबतच, या प्रकरणाची तक्रार मी स्वतःही केली असून माहितीच्या अधिकारांतर्गत (आरटीआय) अर्ज दाखल केला असल्याचे सांगण्यात आले आहे.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या नावावर विहिरीचे काम दाखविण्यात आले असून प्रत्यक्षात त्यांना या प्रक्रियेची माहिती नसल्याचा दावा करण्यात आला आहे. एक-दोन नव्हे तर अनेक शेतकऱ्यांच्या नावांचा या प्रकरणात समावेश असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणाची सत्यता तपासण्यासाठी मंजुरीपासून ते प्रत्यक्ष काम, मोजमाप, छायाचित्रे, लाभार्थी कागदपत्रे तसेच बिले अदा करण्यापर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेची चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
आज प्रशासनाकडे निवेदन; पोहोचही घेतली
शेतकऱ्यांनी आज संबंधित प्रशासनाकडे लेखी निवेदन सादर करून त्याची अधिकृत पोहोच घेतली आहे. त्यामुळे आता प्रशासन या तक्रारीची दखल घेऊन चौकशी कशी करते, याकडे दौलापुरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
या प्रकरणात शासकीय निधीचा गैरवापर झाला आहे का? शेतकऱ्यांच्या नावावर कागदोपत्री काम दाखविण्यात आले का? प्रत्यक्ष काम झाले असल्यास त्याची पाहणी कोणी केली? मोजमाप व बिले मंजूर करण्याची प्रक्रिया नेमकी कशी झाली? या सर्व प्रश्नांची उत्तरे चौकशीतून समोर येणे अपेक्षित आहे.
“शेतकऱ्यांच्या नावाचा वापर करून गैरप्रकार झाला असेल तर दोषींवर कठोर कारवाई करावी,” अशी मागणी तक्रारदार शेतकऱ्यांनी केली आहे.
दरम्यान, संबंधित विभागाची अधिकृत भूमिका आणि चौकशीचा अहवाल समोर आल्यानंतर या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.








