वाढीव वीज बिलांमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त
चुन्नीलाल मोटघरे | चंद्रपूर
ब्रह्मपुरी ,मुडझा, हळदा , आवळगाव, भूज, वांद्रा, बरडकिन्ही व गांगलवाडी परिसरात नव्याने बसवण्यात आलेल्या ‘स्मार्ट मीटर’मुळे वीज बिलात दहापटीने वाढ झाली असून सर्वसामान्य वीज ग्राहक अक्षरशः मेटाकुटीस आला आहे. ही वाढीव वीज बिले तत्काळ दुरुस्त करून नागरिकांना दिलासा द्यावा, या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (भाकप) वतीने महावितरणच्या गांगलवाडी येथील सहाय्यक अभियंत्यांना धडक निवेदन देण्यात आले.
यावेळी भाकपचे नेते कॉ. विनोद झोडगे पाटील यांनी महावितरणच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला. “स्मार्ट मीटर बसविल्यापासून वीज बिलांमध्ये भरमसाठ वाढ झाली आहे. सरासरीपेक्षा पाच ते दहापट रक्कम बिलांवर आकारली जात असल्याने नागरिकांचे आर्थिक बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. महावितरणने पारदर्शक तपासणी करून वाढीव आकारणी त्वरित रद्द करावी,” हा प्रश्न फक्त गांगलवाडी परिसरातील नागरिकांचा नसून संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांचा आहे. असा थेट आरोप त्यांनी केला.
गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
या आंदोलनादरम्यान मुडझा गांगलवाडी परिसरातील बाधित वीज ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. “आम्ही वीज वापर नेहमीप्रमाणेच करत असताना बिलांमध्ये अचानक झालेली ही वाढ अनाकलनीय आहे. महावितरणने सामान्य जनतेची लूट थांबवावी,” अशी संतप्त भावना उपस्थित ग्राहकांनी व्यक्त केली.
मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास 8 सप्टेंबर रोजी तीव्र आंदोलनाचा इशारा
वाढीव बिलांची तातडीने दुरुस्ती न झाल्यास आणि स्मार्ट मीटरच्या तांत्रिक त्रुटी दूर न केल्यास महावितरण कार्यालयावर तसेच उपविभागीय कार्यालय वर नागरिकांच्या वतीने बैल बंडी, ट्रॅक्टर सह उग्र जन आक्रोश मोर्चा काढला जाईल, असा इशाराही यावेळी कॉम्रेड विनोद झोडगे यांनी दिला आहे.
निवेदन सादर करतेवेळी कॉ. विनोद झोडगे पाटील ,नानाजी झरकर, गोलू दरवे, विनोद पाटील अमोल मानापुरे यांच्यासह मुडझा,गांगलवाडी व लगतच्या परिसरातील शेतकरी, व्यावसायिक आणि स्थानिक वीज ग्राहक
उपस्थित होते.








