किनवट व माहूर तालुक्यात पावसाच्या खंडामुळे खरीप पिके हातातून गेली.
दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे ‘निर्भय युवा ग्रामीण पत्रकार संघटने’कडून शासनाकडे तातडीच्या मदतीची आक्रमक मागणी
किनवट ता. प्रतिनिधी- मार्कंडेय सिरामवार
किनवट तालुक्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाने पूर्णपणे दडी मारल्यामुळे खरीप हंगामातील पिके अक्षरशः हातची गेली आहेत. ऐन पिकांच्या वाढीच्या आणि फळ धरण्याच्या काळात पावसाने पाठ फिरवल्यामुळे संपूर्ण तालुक्यात हाहाकार माजला असून सध्या भीषण दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या गंभीर समस्येची प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी ‘निर्भय युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे’ राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांनी केली आहे.
निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक फटका किनवट तालुक्यातील अन्नदात्या बळीराजाला बसला असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर गणेश कचकलवार यांनी प्रशासनाला तातडीच्या उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे महसूल व कृषी विभागाने तातडीने फील्डवर जाऊन प्रत्यक्ष नुकसानीचे पंचनामे करावेत आणि खऱ्या परिस्थितीचा सविस्तर दुष्काळ अहवाल शासनाला सादर करावा.
संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ भरीव आर्थिक मदत व नुकसानभरपाई देऊन या बिकट परिस्थितीतून सावरण्यात यावे.
पावसाच्या खंडामुळे आगामी काळात तालुक्यातील भूजल पातळी खालावून पिण्याच्या पाण्याची अत्यंत गंभीर समस्या निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. प्रशासनाने याची आतापासूनच दखल घेऊन प्रभावी उपाययोजना हाती घ्याव्यात.
प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केवळ कागदी घोडे न नाचवता प्रत्यक्ष परिस्थितीचे अवलोकन करून तातडीने पावले उचलावीत.
शेतकरी वर्ग आधीच आर्थिक संकटात सापडला असून, अशा या अत्यंत कठीण प्रसंगी शासनाने कुठलाही विलंब न करता तात्काळ लक्ष घालून मदत जाहीर करावी, असे आवाहन गणेश कचकलवार यांनी केले आहे. तसेच, प्रसंगी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले आहे. या गंभीर प्रश्नावर शासन आणि प्रशासन नेमकी काय भूमिक घेते, याकडे संपूर्ण किनवट तालुक्याचे डोळे लागले आहेत.








