माहूर चा मानाचा पोळा उत्साहात साजरा
तालुका प्रतिनिधी – अंबादास मुकटे, माहूर
माहूर, दि. ११ :- माहूर येथे बळीराजाचा आणि पशुधनाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा पारंपारिक मानाचा पोळा मोठ्या उत्साहात, धार्मिक वातावरणात विविध प्रकाराच्या भव्य आणि दिव्य अशा कार्यक्रमांसह साजरा करण्यात आला. श्री रेणुका देवी संस्थानच्या वतीने आयोजित या सोहळ्यास माहूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
पोळ्यानिमित्त सर्वप्रथम जाग माथा येथे श्री रेणुका मातेचा मानाचा नंदी आणण्यात आला. याठिकाणी नंदीची आकर्षक सजावट करण्यात आली. मानकऱ्यांच्या हस्ते नंदीची विधिवत पूजा व महाआरती करण्यात आली. यावेळी तहसीलदार जगताप, संस्थानचे विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय कणव, दुर्गादास भोपी, अरविंद देव, व्यवस्थापक विजय राऊत, सुरक्षा अधिकारी महादेव मुंढे यांच्यासह संस्थानच्या विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाआरतीनंतर उपस्थित मान्यवर व मानकऱ्यांना संस्थानच्या वतीने मानाचे फेटे व शेले देऊन सन्मान करण्यात आला तर मानाचे निशाण भावणीदास भोपी यांनी धारण केले. त्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात मानाचा नंदी व निशाणाची माहूर शहरातून नगरपरिक्रमा काढण्यात आली.
ही नगरपरिक्रमा माहूर येथील पुरातन श्री कपिलेश्वर मंदिरात पोहोचल्यानंतर तेथील दर्शन व पूजेनंतर पुढे शिवाजी चौक येथे आली. पारंपरिक पद्धतीने येथे पोळा फुटला आणि मानाच्या पोळ्याची सांगता करण्यात आली.
या संपूर्ण सोहळ्याचे उत्कृष्ट नियोजन श्री रेणुका देवी संस्थानच्या विविध विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केले. पोळ्यानिमित्त संजय कणव, पत्रकार अंबादास मुकटे व संस्थानच्या वतीने उपस्थितांसाठी चहा व नाश्त्याचे नियोजन करण्यात आले होते.
पोळा नियोजनाची जबाबदारी व्यवस्थापक विजय राऊत, लेखापाल योगेश साबळे, नितीन गेडाम, अरविंद राठोड, श्रावण जाधव यांनी पार पाडली. सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन सुरक्षा अधिकारी महादेव मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रे, शिंदे, वानखेडे, जाधव, इंद्रजित, घुगे यांच्यासह संपूर्ण सुरक्षा रक्षकांनी चोखपणे पार पाडले.








