# शंकर विद्यालय कोळंबी येथे कौशल्यात्मक दोन दिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न#
(साहित्य, काव्य आणि पर्यावरणपूरक शिल्पकलेतून विद्यार्थ्यांना मिळाले ज्ञानाचे धडे)
गजाजन तायडे (प्रतिनिधी) कोळंबी (ता. अकोला) : विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, सर्जनशील व कलात्मक विकासाला चालना मिळावी, तसेच विद्यार्थ्यांच्या अंगी दडलेल्या विविध कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने कोळंबी येथील शंकर विद्यालयामध्ये कौशल्यात्मक दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत विद्यालयातील सुमारे १५० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
या दोन दिवसीय कार्यशाळेसाठी सुप्रसिद्ध साहित्यिक, गझलकार, पत्रकार, चित्रकार व शिल्पकार मिलिंद अवचित इंगळे हे प्रशिक्षक म्हणून उपस्थित होते. आपल्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वातून त्यांनी विद्यार्थ्यांना साहित्य, काव्य, गझल, चित्रकला तसेच पर्यावरणपूरक मूर्तिकलेचे मार्गदर्शन करून कार्यशाळेला वेगळे स्वरूप प्राप्त करून दिले.
पहिल्या दिवशी काव्यविश्वाची विद्यार्थ्यांना ओळख
कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी साहित्य आणि काव्य या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. साहित्यिक व गझलकार मिलिंद अवचित इंगळे यांनी विद्यार्थ्यांना काव्याचे विविध प्रकार, काव्याची निर्मिती प्रक्रिया, शब्दांची निवड, यमक, लय, आशय आणि काव्यवाचनाचे तंत्र याबाबत सोप्या व रंजक पद्धतीने माहिती दिली.
यावेळी त्यांनी आपल्या सुमधुर आवाजात विविध काव्यप्रकारांचे वाचन करून विद्यार्थ्यांना काव्याचा आनंद दिला. त्यांच्या काव्यवाचनामुळे विद्यार्थ्यांमध्येही उत्साह निर्माण झाला. अनेक विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कविता सादर करत काव्यवाचनाचा अनुभव घेतला. त्यामुळे कार्यशाळेचे वातावरण आनंदमय आणि साहित्यिक झाले.
विद्यार्थ्यांना संतवाणी, अभंग, चारोळी, अष्टाक्षरी, मुक्तछंद, गीत आणि गझल या विविध काव्यप्रकारांची ओळख करून देण्यात आली. प्रत्येक काव्यप्रकाराची वैशिष्ट्ये उदाहरणांसह समजावून सांगण्यात आली. तसेच मराठी साहित्यविश्वातील विविध कवी व साहित्यिकांच्या साहित्याचा परिचय करून देत विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या सत्रादरम्यान कवी अनिल डाहेलकर यांचीही उपस्थिती होती. त्यांच्या उपस्थितीमुळे विद्यार्थ्यांना साहित्यिक व्यक्तिमत्त्वांशी संवाद साधण्याची संधी मिळाली.
मातीच्या गणेशमूर्तीतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धन आणि पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती या विषयावर प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आले.
वाढते प्रदूषण, जलप्रदूषण आणि मानवी हस्तक्षेपामुळे निसर्गाचे बिघडत चाललेले संतुलन यावर विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला. सण-उत्सव साजरे करताना पर्यावरणाची हानी होणार नाही, याची काळजी घेणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले.
चित्रकार व शिल्पकार मिलिंद अवचित इंगळे यांनी विद्यार्थ्यांना साळूमातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कशी तयार करावी, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक देत स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन केले. मूर्तीची प्राथमिक रचना, आकार देणे, चेहरा व विविध अवयव तयार करणे, मूर्तीला सुबक स्वरूप देणे अशा मूलभूत बाबी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून शिकविण्यात आल्या.
विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने गणेशमूर्ती साकारताना मोठा उत्साह दाखविला. केवळ मूर्ती बनविणे एवढाच या उपक्रमाचा उद्देश नसून ‘स्वतः बनविलेली पर्यावरणपूरक मूर्ती आपल्या घरी स्थापन करू आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्याचा संकल्प करू’, असा संदेश विद्यार्थ्यांनी दिला.
कृतीतून शिक्षण देण्याचा अभिनव उपक्रम या दोन दिवसीय कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता कृतीतून शिक्षण, सर्जनशील विचार, कलात्मक अभिव्यक्ती आणि पर्यावरण संवर्धन यांची सांगड घालण्यात आली. साहित्य आणि कलेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देतानाच स्वतः काहीतरी निर्माण करण्याचा आत्मविश्वासही त्यांच्यामध्ये निर्माण झाला.
विद्यार्थ्यांनी कार्यशाळेतील विविध उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतल्याने कार्यशाळेचा उद्देश सफल झाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. अशा कार्यशाळांमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला तसेच त्यांच्या सुप्त कलागुणांना निश्चितच दिशा मिळते, असेही यावेळी सांगण्यात आले.
शिक्षकांचे मोलाचे योगदान या कौशल्यात्मक दोन दिवसीय कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी शंकर विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोज तायडे होते. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक श्री. मनोज तायडे, ज्येष्ठ शिक्षक श्री. जयकुमार राठोड, श्री. सचिन गायकवाड, कु. शाईन शेख, सौ. विजया गिरी यांच्यासह विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
विद्यार्थ्यांना साहित्य, कला आणि पर्यावरण संवर्धनाची जोड देणारी ही कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक, आनंददायी आणि प्रेरणादायी ठरली. ‘शिका, सर्जन करा आणि पर्यावरणाचे रक्षण करा’ हा संदेश देत कार्यशाळेची सांगता करण्यात आली.








