पांदण रस्त्यांच्या कामात दिरंगाई खपवून घेणार नाही!
आमदार भीमराव केराम ॲक्शन मोडमध्ये; किनवट–माहूरच्या कामांचा घेतला आढावा
किनवट प्रतिनिधी – मार्कंडेय सिरामवार
किनवट : मुख्यमंत्री बळीराजा शेत-पांदण रस्ते योजनेअंतर्गत किनवट–माहूर तालुक्यातील पांदण रस्त्यांच्या कामांचा आज आमदार भीमरावजी केराम यांच्या अध्यक्षतेखाली आढावा घेण्यात आला. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी बी. सरवनन यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
शेतकऱ्यांना शेतापर्यंत पोहोचण्यासाठी पक्के व सुलभ रस्ते उपलब्ध करून देणे आवश्यक असून, पांदण रस्त्यांची प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावून वेळेत पूर्ण करा, अशा स्पष्ट सूचना आमदार केराम यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
किनवट व माहूर तालुक्यातील पांदण रस्त्यांच्या विविध कामांचा यावेळी सविस्तर आढावा घेण्यात आला. कामांमध्ये येणाऱ्या अडचणी, प्रलंबित प्रस्ताव आणि प्रत्यक्ष कामाची स्थिती याबाबत चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांच्या हिताच्या कामांना कोणत्याही परिस्थितीत विलंब होता कामा नये, अशी भूमिका आमदार केराम यांनी स्पष्ट केली.
यावेळी पांदण रस्ता समितीचे सहअध्यक्ष बाबुराव केंदे, किनवट तहसीलदार श्रीमती शारदा चौडेकर, माहूर तहसीलदार अभिजित जगताप, समिती सदस्य कांतराव घोडेकर, विलास चौधरी, जगदीश नलमेलवार, सागर पिसारीवार, एस. के. नेमानीवार यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत रस्ता पोहोचवण्यासाठी प्रशासनाने आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावी आणि कामांना प्रत्यक्ष गती द्यावी, असे निर्देश बैठकीत देण्यात आले.








