मुखेड सह संपूर्ण नांदेड जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करा:डॉ.श्रावण रॅपनवाड यांची राज्यपालांकडे मागणी.
विशेष प्रतिनिधी | मनोज बिरादार
दीर्घ कालावधीपासून दडी मारलेल्या पावसामुळे मुखेड तालुक्यासह संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील पिके पार उद्ध्वस्त झाली असून शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे.या पार्श्वभूमीवर,मुखेडसह संपूर्ण नांदेड जिल्हा तातडीने ‘कोरडा दुष्काळग्रस्त’ जाहीर करावा,अशी आग्रही मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस डॉ.श्रावण रॅपनवाड यांनी राज्याचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले आणि ओबीसी राष्ट्रीय उपाध्यक्ष भानुदास माळी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या एका शिष्टमंडळाने नुकतीच राजभवनात राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची भेट घेतली.आगामी जनगणनेत ‘ओबीसी’साठी स्वतंत्र रकाना असावा,या मागणीसाठी ही भेट घेण्यात आली होती.या बैठकीदरम्यान राज्यातील शेती आणि शेतकऱ्यांच्या गंभीर परिस्थितीवरही सविस्तर चर्चा झाली.
याच संधीचा फायदा घेत डॉ.श्रावण रॅपनवाड यांनी डोंगराळ व निसर्गतःच दुष्काळी भाग असलेल्या मुखेड तालुक्याची भीषण परिस्थिती राज्यपालांसमोर मांडली.पावसाच्या मोठ्या खंडामुळे सोयाबीन,कापूस या प्रमुख पिकांसह सर्वच पिके वाळल्याने यंदाचा संपूर्ण खरीप हंगाम वाया गेला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जिल्ह्यात त्वरित कोरडा दुष्काळ जाहीर करून आर्थिक मदत व आवश्यक सवलती लागू कराव्यात, अशी मागणी करणारे निवेदन त्यांनी नाना पटोले आणि भानुदास माळी यांच्या उपस्थितीत राज्यपालांना सोपवले.
या प्रसंगी काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेत्यांसह राज्यपालांचे ओएसडी (OSD) डॉ.निशिकांत देशपांडे आणि शिष्टमंडळातील इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.








