जिल्हा सह. बँकेच्या प्रारूप मतदार यादीतून दाभाडे यांचे नाव वगळले
विभागीय सहनिंबधकाचा आदेश !
टाकळीभान प्रतिनिधी // संदीप जाधव
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील श्री संत सावता माळी वि.का. सेवा संस्था लि. या संस्थेचे नाव जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या सन २०२६ ते २०३१ या कालावधीच्या पंचवार्षिक निवडणूक कामी प्रारूप मतदार यादीतील प्रतिनिधी विलास भाऊसाहेब दाभाडे यांचे नाव परिशिष्ट अ नूसार वगळण्याचा निर्णय जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा विभागीय सहनिंबधक, सहकारी संस्था नाशिक विभाग संभाजी कदम यांनी नूकताच दिला आहे.
श्री संत सावता माळी वि.का. सेवा संस्थेचे संचालक विलास भाऊसाहेब दाभाडे यांनी जिल्हा बँक निवडणूकीत सहभाग घेण्यासाठी श्री संत सावता माळी सेवा संस्थेने त्यांच्या नावाचा ठराव दिला होता. संबधित ठरावास येथील आप्पासाहेब नानासाहेब रणनवरे यांनी हरकत घेतली होती. त्या हरकतीनूसार दाभाडे यांच्या आजी सुभद्राबाई दगडू नाईक यांच्या नावावर गट नं.७६ मध्ये २ हेक्टर ८५ आर इतकी जमीन होती.
या जमीनीवर टाकळीभान विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे कर्ज थकीत असताना बेकायदेशीर हस्तांतर करून विलास दाभाडे व कुटूंबाच्या नावावर करण्यात आले आहे. या क्षेत्रावर ८ लाख ८१ हजार मुद्दल व ९ लाख ६९ हजार रूपये व्याज असे एकूण १८ लाख ५० हजार रूपयांची थकबाकी आहे. त्यांनी ती थकबाकी न भरता तसेच न दर्शविता निवडणूक लढवून संचालकपद मिळविले आहे. त्यामुळे ते सदस्य म्हणून राहण्यास व ठराव देण्यास अपात्र असल्याचे हरकतीत म्हटले होते.
यासंदर्भात विलास दाभाडे यांचे म्हणणे ऐकण्यात येवून सहाय्यक निंबधक व जिल्हा उपनिंबधक यांचाही अभिप्राय नोंदविण्यात आला होता. मात्र तो फेटाळण्यात आला. त्यानूसार दाभाडे यांचे जिल्हा सह बँकेच्या प्रारूप यादीतील नाव परिशिष्ट अ नूसार वगळण्यात आल्याचा निर्णय देण्यात आला आहे. ऐन जिल्हा बँकेच्या निवडणूकीच्या तोंडावर हा मोठा धक्का मानला जात आहे.








