चिंचोलीत अवैध वाळु वाहतूकीला उधाण; सरपंच आक्रमक, आंदोलनाचा इशारा…
राहुरी // दिनेश गायकवाड
तालुक्यातील चिंचोली येथील प्रवरा नदीपात्रातून गत काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अवैध वाळूतस्करीला ऊत आला आहे. या अवैध वाळुवाहतूकीने गाव परिसरातील नुकतेच डांबरीकरण व काँक्रिटीकरण झालेले रस्ते खचले असून मोठमोठे खड्डे पडले आहेत. ग्रामस्थांना अशा जीवघेण्या रस्त्यावरुन जा-ये करावी लागत आहे. प्रशासनाने जुजबी कारवाई करुन परतताच पुन्हा ही वाहतूक सुरु होत असते. यावर प्रशासनाकडून कडक धोरण अवलंबत ही अवैध वाळुवाहतूक कायमस्वरुपी बंद करावी अन्यथा आंदोलनाचा इशाराच चक्क सरपंच शोभाताई लाटे यांनी दिला आहे.
चिंचोली येथील प्रवरा नदीपात्र वाळू तस्करांसाठी मोकळे मैदान बनले आहे. कुणी, कधीही नदीपात्रात उतरुन सर्रास वाळू उपसा करीत आहे. जेसीबी, डंपर सह अत्याधुनिक यंत्रसामग्री वापरुन नदीपात्रात पाणी असूनही नदीचे पात्र अक्षरश: ओरबाडले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यामुळे नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला धोका निर्माण होत आहे. पर्यायाने परिसरातील पाणी पातळी खालावली आहे. नदीपात्रालगतच्या शेतकऱ्यांच्या विहिरींना यामुळे धोका निर्माण झाला आहे. वाळूचा अधिकृत लिलाव सुरू असल्यासारखी वाळूची मोठमोठी वाहने सुरू असल्याने
गाव परिसरातील या अवजड वाहनाने पक्के रस्ते खचले आहेत. प्रशासन याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष तर करत नाही ना? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
रात्रंदिवस सुरु असलेल्या या वाहनांमुळे गावातील रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली असून, अपघातांचा धोकाही प्रचंड वाढला आहे. प्रशासनाने तातडीने या वाळू तस्करांवर कडक कायदेशीर कारवाई करावी व ही अवैध वाळुवाहतूक कायमची थांबवावा, अन्यथा चिंचोली ग्रामस्थांच्या वतीने आंदोलनाचा इशारा सरपंच शोभाताई लाटे सह ग्रामस्थांनी दिला आहे.
अवैध वाळुवाहतूकीबरोबरच गाव परिसरात अवैध दारुची विक्री मोठ्या प्रमाणात सुरु आहे. त्यावर पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले मात्र थातूरमातूर कारवाई केली जात आहे. गावात वाळुवाहतूक व अवैध व्यवसायाचा प्रशासनाने कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी सरपंच सौ. लाटे यांनी केली आहे.








