राहुरीत १६ सप्टेंबरला होणाऱ्या मोफत नेत्र व दंत तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा. आयोजकांचे आवाहन
मोतीबिंदू रुग्णांवर एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया
दिनेश गायकवाड //राजुरी प्रतिनिधी
राहुरी : एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय, हडपसर (पुणे) संचलित नेत्र तपासणी केंद्र, राहुरी, दिव्यांग शक्ती सेवा संस्था, राहुरी आणि राहुरी तालुका प्रहार दिव्यांग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने श्री. जगन्नाथ विठ्ठल सूर्यवंशी सर यांच्या मातोश्री कै. तुळसाबाई विठ्ठल सूर्यवंशी यांच्या पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर बुधवार, दि. १६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत संत गाडगे महाराज आश्रमशाळा, नगर-मनमाड रोड, राहुरी येथे होणार आहे.
शिबिरात सहभागी होणाऱ्या रुग्णांची निःशुल्क नेत्र व दंत तपासणी करून त्यांना आवश्यक तो सल्ला व मार्गदर्शन देण्यात येणार आहे. तपासणीदरम्यान मोतीबिंदू आढळून आलेल्या रुग्णांची एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय, पुणे येथे निःशुल्क मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
शस्त्रक्रियेसाठी निवड झालेल्या रुग्णांच्या पुणे येथे ये-जा करण्याची, राहण्याची तसेच जेवणाची व्यवस्था पूर्णपणे निःशुल्क करण्यात येणार आहे.
शिबिरासाठी येताना रुग्णांनी आधार कार्ड, सध्या सुरू असलेली औषधे/गोळ्या तसेच डॉक्टरांचे वैद्यकीय रिपोर्ट सोबत आणावेत, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.
गरजू नागरिकांनी तसेच परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.








