समता शिक्षक परिषद व समतावादी साहित्य मंडळाचा अभिनव उपक्रम
महात्मा फुले द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त 25 पुस्तके प्रकाशित होणार- भरत शिरसाठ
निलेश सोनवणे // जळगांव जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषद आणि समतावादी साहित्य मंडळाची विशेष सभा आज भाऊसाहेब राऊत विद्यालय संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भरत शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव येथे संपन्न झाली.
सदर प्रसंगी बोलताना श्री भरत शिरसाठ यांनी सांगितले की केंद्र सरकार तसेच महाराष्ट्र सरकारच्या वतीने 11 एप्रिल 2026 ते 11 एप्रिल 2027 हे महात्मा ज्योतिराव फुले यांचे द्विशताब्दी जयंती वर्ष विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरे केले जात आहे. सदर द्विशताब्दी जयंती वर्षास लोक चळवळीचे स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषद व समतावादी साहित्य मंडळाच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून महात्मा ज्योतिराव फुले यांचे महान कार्यकर्तृत्व समाजापर्यंत पोहोचावे याकरिता जिल्ह्यातील 25 शिक्षक महात्मा फुले यांच्या जीवन कार्यावर आधारित पुस्तके प्रकाशित करणार आहेत. महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषद आणि समतावादी साहित्य मंडळाच्या वतीने सदर प्रकाशन सोहळा नोव्हेंबर महिन्यात संपन्न होणार आहे. समतावादी साहित्य मंडळाच्या वतीने 2022 मध्ये 14 पुस्तकांचा प्रकाशन सोहळा एकाच वेळेस घेण्यात आला होता. यानंतर एकाच मंचावर समता शिक्षक परिषद आणि समतावादी साहित्य मंडळाच्या माध्यमातून 25 पुस्तके प्रकाशित करण्याचा महाराष्ट्रातील कदाचित हा मोठा विक्रमच असेल.
सदर प्रसंगी उपस्थित 25 लेखकांनी आपले विषय जाहीर केले आणि राज्यातील हा अभिनव उपक्रम यशस्वी करून दाखवणार असल्याबद्दल ग्वाही दिली. महात्मा फुले यांचे सामाजिक कार्य, महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य, महात्मा फुले व सत्यशोधक समाज, महात्मा फुले व सार्वजनिक सत्यधर्म, महात्मा फुले- मानवता वादाचे जनक, महात्मा फुले यांचे शेतकऱ्यांसंदर्भात विचार, महात्मा फुले यांना अभिप्रेत असलेली शिक्षण पद्धती, महात्मा फुले -एक उद्योजक, महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुले, स्री- उद्धारक महात्मा फुले, महात्मा फुले आणि कौटुंबिक संघर्ष, महात्मा फुले आणि सामाजिक समता इत्यादी विषयांवर सदर पुस्तकांचे लेखन होणार आहे. सदर पुस्तकांचा भव्य प्रकाशन सोहळा नोव्हेंबर महिन्यामध्ये संपन्न होणार आहे. संघटनेमार्फत प्रतिवर्षी उपक्रमशील शिक्षकांना पुरस्कार दिले जातात. सदर पुरस्कार नियोजना संदर्भात सभेत सविस्तर चर्चा करण्यात आली.
सदर प्रसंगी धनराज मोतीराय आण्णा, रावसाहेब जगताप यांनी मनोगत व्यक्त केले. संघटनेचे सरचिटणीस सोपान भवरे यांनी विषय पत्रिका वाचन केले. रणजीत सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले तर जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब सोनवणे यांनी आभार मानले.
‘समतांगण’ विशेषांक संपादन समिती प्रमुखपदी अजय भामरे यांची, अर्थ समिती प्रमुख पदी सौ. प्रतिभा पाटील यांंची तर कार्यक्रम नियोजन समिती प्रमुख पदी परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष रणजित सोनवणे यांची निवड करण्यात आली.
सदर प्रसंगी धनराज मोतीराय अण्णा, सेवानिवृत्त प्राचार्य यशवंतराव मोरे, साहेबराव बागुल, साळवा हायस्कूलचे मुख्याध्यापक सुधाकर मोरे, पिंपळगाव हायस्कूलचे पर्यवेक्षक प्रेमसिंग जाधव, जिजामाता विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रवीण केदार, डॉक्टर प्रदीप सुरवाडकर, संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष रावसाहेब जगताप, जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब सोनवणे, धामणगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक हेमेंद्र सपकाळे, जिल्हाध्यक्षा श्रीमती वर्षा अहिरराव, श्रीमती भारती ठाकरे, श्रीमती प्रतिभा जाधव, सौ. सरिता वासवानी, डाॅ. चित्रा पगारे, श्रीमती शैला जाधव, चेतन नवगीरे, निलेश सोनवणे, मनोज बिऱ्हाडे, महेश तायडे, राजेंद्र पाटील, कपिल देशमुख इत्यादी शिक्षक उपस्थित होते.








