जाम गावातील घरावर मालवाहू पिकअप ची धडक
महिला ठार, चौघे गंभीर जखमी !
जुन्या वादातून धक्कादायक प्रकार; जीवघेण्या हल्ल्याचा आरोप बबन घुगे, पत्नी व मुलगी तिघेही पोलिसांच्या ताब्यात
मिलिंद इंगळे जिल्हा प्रतिनिधी
बार्शीटाकळी, दि. १५ : तालुक्यातील जाम गावात जुन्या वादातून संतप्त झालेल्या व्यक्तीने मालवाहू पिकअप वाहनाने घराला धडक दिल्याची धक्कादायक घटना शुक्रवार, दि. ११ सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. या घटनेत घराच्या ओट्यावर बसलेल्या सोलीबाई मखराम जाधव (वय अंदाजे ६० वर्षे) यांचा मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले. या प्रकरणी बार्शीटाकळी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जगदीश मखराम जाधव यांची आई सोलीबाई जाधव, भाऊ शेषराव जाधव व इतर कुटुंबीय जाम येथील जुन्या घराच्या ओट्यावर बसले होते. त्यावेळी बबन घुगे, त्यांची पत्नी चंद्रकला घुगे व मुलगी सोनू घुगे यांनी तेथे येऊन, “आमच्याविरुद्ध रिपोर्ट का दिला?” असा जाब विचारत शिवीगाळ केली. यावेळी वाद वाढला आणि आरोपींकडून मारहाणीची धमकी देण्यात आल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
यानंतर आरोपी घरी गेले. काही वेळातच बबन घुगे यांनी पिकअप मालवाहू वाहन घेऊन जाधव यांच्या घराला जोरदार धडक दिली. या धडकेत घराच्या ओट्यावर बसलेल्या कुटुंबीयांना वाहनाची धडक बसून सोलीबाई जाधव यांचा जागीच अथवा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर शेषराव जाधव (वय अंदाजे ४०), विद्या शेषराव जाधव (वय अंदाजे ३८), कविता राठोड (वय अंदाजे ३३) आणि वनिता जाधव हे गंभीर जखमी झाले.
तिघांविरुद्ध गुन्हा; अटक
या घटनेप्रकरणी बार्शीटाकळी पोलिसांनी अपराध क्रमांक ६०५/२०२६ नुसार बीएनएसच्या विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी बबन घुगे (वय अंदाजे ४०), चंद्रकला बबन घुगे (वय अंदाजे ३७) आणि सोनू बबन घुगे (वय अंदाजे १९) या तिघांना अटक केली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास परिविक्षाधीन पोलीस अधिकारी आनंद कांदे करीत आहेत. घटनेमुळे जाम गावात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून घटनेच्या सर्व बाजूंचा तपास केला जात आहे.








