पत्रतपस्वी ग्रंथप्रकाशन म्हणजे पितृभक्तीचा अविस्मरणीय सोहळा : अजीम नवाज राही
◾◾◾
विदर्भ न्यायने घेतली प्रयोगशील विद्यार्थ्यांची नोंद, कुशाग्र विद्यार्थ्यांचा सन्मान : मान्यवरांच्या मांदियाळीत पार पडला पत्रतपस्वी ग्रंथ विमोचनाचा यादगार सोहळा
साखरखेर्डा : (असलम अंजुम)
दिनांक १५ सप्टेंबर २६ : बाप ज्या वाटेवरचा वाटसरू असतो त्याच वाटेवरचा वाटसरू मुलगा होईल याची शाश्वती नसते. बापाने डेरेदार केलेल्या अनेक परंपरा मुलांनी सैरभैर केल्याची अनेक उदाहरणे आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्व. भोजराज गाडेकर यांनी ग्रामीण पत्रकारितेला स्वतःला वाहून घेतले. विदर्भ न्यायच्या माध्यमातून ग्रामीण पत्रकारितेचा एक वटवृक्ष त्याचे संवर्धन, संगोपन स्व. भोजराज गाडेकर यांच्या स्मरणाची परंपरा पत्रतपस्वी या ग्रंथप्रकाशनाच्या माध्यमातून पुढे नेण्याचे सश्रद्ध द्योतक आहे. पत्रकार वडिलांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त पाच पत्रकारांना उत्कृष्ट कार्यगौरव पत्रकारिता देऊन विदर्भ न्यायने भोजराज गाडेकर यांच्या मनातील श्रद्धांजली अर्पित केली आहे. असे गौरवोद्गार प्रख्यात मराठी कवी अजीम नवाज राही यांनी काढले.
शनिवार दि. १२ सप्टेंबर २०२६ रोजी पत्रतपस्वी स्व भोजराज नरहरी गाडेकर यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त पलसिध्द महास्वामी मठाच्या सभागृहात आयोजित पुरस्कार, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तथा पत्रतपस्वी ग्रंथप्रकाशन निमित्त ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ठाणेदार युवराज रबडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मठाधिपती सिध्दचैतन्य शिवाचार्य महाराज, प्राचार्य डॉ. निलेश गावंडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिलीपराव बेंडमाळी, माजी पंचायत समिती उपसभापती सुनील जगताप, सरपंचपती अमित जाधव, अॅड. अश्विनी सावजी, अॅड. निशिकांतराजे जाधव, जगदेव मराठे, शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष अशोक नागरे, नंदकिशोर शिंगणे, लोकजागरचे प्रविण गीते, मॅथ्स कोचिंग क्लासेसचे संचालक शिवशंकर डुकरे पाटील, गोपाल मानतकर, प्रा दिलीप नाईकवाड, क्षितीत दर्जे, सूतगिरणीचे कार्यकारी संचालक बबनराव लोढे, सैय्यद रफीक, आयुबसेठ कुरेशी, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य रावसाहेब देशपांडे, यशराज ग्राफीक्सचे डिझायनर नारायण भोलवणकर, ग्रामपंचायत सदस्य संदीप खिल्लारे, माजी सरपंच दाऊत कुरेशी, रमेश ठोसरे, मुख्याध्यापक विष्णू ठोसरे, पत्रकार डि एन पंचाळ, अशोक इंगळे, सचिन खंडारे, गजानन सरकटे, रवी वाघ, मनोज जाधव, संजय आंभोरे हे उपस्थित होते. प्रारंभी श्रीमज्जगद्गुरु पलसिध्द महास्वामी यांनी पत्रतपस्वी स्व भोजराज नरहरी गाडेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून समईप्रज्वलन केले. तदनंतर पत्रतपस्वी ग्रंथाच्या डिजीटल कव्हरपेजचे रिबीन कापून विमोचन करण्यात आले. दरम्यान दीपक आखरे, ज्ञानेश्वर राहाटे यांच्या स्वागत गीतांच्या स्वर लहरींनी मान्यवरांवर वर्षाव केला. प्रारंभापासून समारोपापर्यंत या भावनिक कार्यक्रमाच्या ओलाव्याने उपस्थितांच्या अंतःकरणाची पकड घेतली.
दरम्यान पाच पत्रकारांना मानचिन्ह, स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. तद्नंतर दहावी, बारावीमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. राजुरेश्वर ज्वेलर्सच्या वतीने ह्या विद्यार्थ्यांना वृक्षभेट देऊन पर्यावरणाचा संदेश देण्यात आला.
आपल्या ओघवत्या भाषणात राही पुढे म्हणाले की, कामाला मालमत्तेचा, संपत्तीचा हेवा असतो भोजराजभाऊंची भक्ती शब्दांवर होती. शब्दांच्या प्रेमाखातर त्यांनी अख्खं आयुष्य ग्रामीण पत्रकारितेला समर्पित केलं. वर्तमानयुग हे डिजिटल युग आहे सुविधांची गडगंज आयुधे माणसाच्या पायाशी लोळण घेत आहेत. परंतू भोजराजभाऊंनी ग्रामीण भागातून ज्या काळात विदर्भ न्यायच्या माध्यमातून ग्रामीण पत्रकारितेची वाटचाल सुरू केली तो काळ आव्हानांचा, समस्यांचा होता. कठीण कातराला भेदून पिंपळवृक्ष ज्या पध्दतीने फोफावतो आव्हानांना न भिता तोंडघशी पाडण्याचा जिगरबाज स्वभाव भोजराजभाऊंचा होता. जेमतेम शिक्षणाच्या बळावर त्यांचा हात शेवटच्या श्वासापर्यंत लिहता राहिला. शिक्षणाचा प्रतिभेचा सूतराम सबंध नसतो हे भोजराजभाऊ यांच्या लेखनीच्या सातत्याने सिध्द केलं. त्यांचे प्राण ग्रामीण पत्रकारितेमध्ये गुंतले होते. आपल्या मुलांची जडणघडण करताना त्यांनी स्थावर आर्थिक सक्षमता बहाल केली नाही पण शब्दांचा वसा-वारसा त्यांच्या सुपूर्द केला. त्यांच्यातल्या निष्ठेचा भक्तीचा, सचोटीचा परिणाम म्हणून त्यांच्या पहिल्या स्मृती दिनानिमित्त वडिलांच्या संपूर्ण प्रवासाच्या आठवणी पुस्तक रूपातून समाजासमोर मांडल्या. एखाद्या बोरला पाणी लागणे आणि संतती चांगली निघणे प्रत्येकाच्या नशीबी नसते. भोजराजभाऊ हे पुण्यवान आहेत कि त्यांच्या परिवाराने या सोहळ्याला चिरस्मरणीय केले आहे.
◾◾◾
विदर्भ न्याय परिवाराच्या रोमारोमात उपक्रमशिलता भिनलेली : सिध्दचैतन्य शिवाचार्य महाराज
पाखरं आकाशाच्या दिशेने भरारी घेतात. घरटं एकाकी पडतं पक्षी-पक्षीणी पाखरं परत येण्याची वाट पाहतात. घरटं सोडून गेलेली पाखरं इंद्रधनुष्यी आकाशातल्या भौतिक सुखसमृध्दीत रमतात नंतर घराकडे परतने विसरतात. अशा शोकांतिककाळात बापाचा वसा – वारसा, बापाच्या आवडी- निवडीचा, छंदाचा समर्पित भाववृत्तीचा वसा वारसा मुलांनी समर्थपणे खांद्यावर पेलण्याची जबाबदारी हे अपवादानेच घडते. पत्रतपस्वी ग्रंथासाठी संतोष गाडेकरांनी घेतलेली मेहनत वाखाणण्याजोगी आहे.भोजराज गाडेकर यांच्या सहवासातील लोकांना लिहतं केलं. ते क्षण सजीव करून स्मृतीग्रंथाची संकल्पना महानगरीय होती.
◾◾◾
पत्रतपस्वी ग्रंथ ग्रामीण पत्रकारितेच्या वाटेवरचा मैलाचा दगड – डॉ. निलेश गावंडे
वडिलांच्या उपक्रमशीलतेचे बिजारोपन करून संतोष गाडेकर यांनी विदर्भ न्याय पर्यंत मर्यादित न राहता दरवर्षी वेगवेगळ्या उपक्रमांची आखणी करताना समाजामध्ये आपल्या आयोजनाचा उपक्रमशिलतेच्या माध्यमातून समाजाला काहीतरी देणं लागतो याचं सजग भान ठेवत विदर्भ न्यायच्या माध्यमातून उपक्रमशीलतेची दणकट साक्ष आहे. पदरमोडीतून असे खर्चिक कार्यक्रम आयोजित करणे सोपे नसते. वडिलांची पुण्यतिथी घरीही साजरी करता आली असती पण वडिलांच्या पुण्यतिथीला सामाजिक कृतज्ञतेची किनार बहाल करून वस्तुनिष्ठ पत्रकारितेला समर्पित करत प्रेरणा मिळण्यासाठी पत्रकारांना, विद्यार्थ्यांना सन्मानित केले. वडिलांच्या ऋणातून कोणीही उतराई होऊ शकत नाही पत्रकार बापाच्या पुण्यस्मरणानिमित्त सामाजिक जाणिवेतून अशा भावनिक सोहळ्याचे आयोजन करुन मला या स्वागतसमारंभाचे अध्यक्ष केले हे माझे अहोभाग्य आहे असे ते म्हणाले.
◾
या पत्रकारांचा झाला सन्मान
यावेळी सुषमा राऊत देऊळगावराजा, राजेश तोटे खामगाव, मधुकर मोहिते बिबि, सुखनंदन इंगळे बुलडाणा, राजेश दवणे यवतमाळ यांना पत्रतपस्वी स्व भोजराज नरहरी गाडेकर उत्कृष्ट कार्यगौरव पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
—-
पुनम वायसेंनी केली चित्तथरारक प्रात्यक्षिके
◾◾◾◾
दरम्यान दुधा येथील शिवकालीन युगंधर मैदानी खेळात पारंगत कु. पुनम वायसेंनी विविध चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करून रसिकांची वाहवा मिळवली.
कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन कु. मयुरी गजानन झोरे यांनी तर आभार प्रदर्शन मोहम्मद असलम अंजूम यांनी केले. यावेळी ठाणेदार युवराज रबडे, सोहम जीवन गाडेकर यांचीही समयोचित भाषणे झाली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी तेजरावबापू देशमुख, सागर मगर, ज्ञानेश्वर राऊत, संजय देशमुख, दीपक गवळी, विलास आंभोरे, अरूण देशमुख, सुनील रिंढे पाटील, संजय गाडगे, सोमेश्वर इंगळे, विशाल गाडेकर, शिवाजी लहाने यांनी अथक परिश्रम घेतले. यावेळी उर्दू हायस्कूलवर शिक्षक म्हणून निवड झाल्याबद्दल अक्षय गणेश डोईफोडे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.








