श्री गोविंद प्रभू च्या जयघोषाने दुमदुमणार येवला तालुका
फुलांची उधळण टाळ-मृदंगाचा गजर अन् भक्तीचा जागर मंत्री छगन भुजबळांसह संत-महंतांची उपस्थिती ठरणार विशेष आकर्षण
लक्ष्मण घुगे | राजापूर प्रतिनिधी
महानुभाव पंथीयांचे श्रद्धास्थान असलेल्या भगवान श्री गोविंद प्रभूंच्या जयंतीचा भक्तिमय सोहळा येवला तालुक्यातील सायगाव येथे रंगणार आहे फुलांची उधळण श्रींच्या मूर्तीला हारांचा साज हातात नारळ कपाळावर गंध-अक्षता टाळ-मृदंगाचा गजर, मुखी श्री गोविंद प्रभू’चा जयघोष आणि अंतःकरणात अखंड भक्तिभाव अशा मंगलमय वातावरणात येवला तालुका महानुभाव समिती व पंचक्रोशीतील सद्भक्त मंडळींच्या वतीने भगवान श्री गोविंद प्रभू जयंती महोत्सवाचा २९ वा सोहळा भव्य स्वरूपात दिनांक 24 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर दोन दिवस भव्य साजरा होणार आहे
सायगावची पुरातन दत्तभूमी या भक्तिमय सोहळ्याची साक्षीदार ठरणार आहे सायगाव दत्तवाडी येथील श्री दत्त मंदिर हे महानुभाव पंथीयांसह पंचक्रोशीतील लाखो भाविकांच्या श्रद्धेचे स्थान म्हणून ओळखले जाते या पवित्र भूमीला जुना धार्मिक इतिहास लाभला असून १९६५ पूर्वीपासून या मंदिराचे अस्तित्व असल्याचे सांगितले जाते मंदिराच्या परिसरात भाविकांची अखंड वर्दळ असून अनेक भाविक येथे श्रद्धेने नवस करतात नवसाला पावणारे श्रद्धास्थान म्हणूनही या मंदिराची परिसरात विशेष ओळख आहे
पुरातन दत्तभूमीतून निघणार श्रींची भव्य मिरवणूक
याच पावन दत्तभूमीतून गुरुवारी 24 सप्टेंबर रोजी दुपारी ४ ते ६ या वेळेत भगवान श्री गोविंद प्रभूंच्या श्रीमूर्तीची संत-महंतांसह सवाद्य भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. त्यामुळे यंदाच्या जयंती सोहळ्याला ऐतिहासिक आणि आध्यात्मिक पार्श्वभूमी लाभणार आहे
श्री दत्त मंदिराच्या परिसरातून शोभायात्रेला सुरुवात होताच टाळ-मृदंगाचा निनाद भजनाचा स्वर फुलांची उधळण आणि श्री गोविंद प्रभू’च्या जयघोषाने सायगावची दत्तभूमी भक्तिरसात न्हाऊन निघणार आहे
तीन वेळची आरती वर्षभर धार्मिक उपक्रम
सायगाव दत्तवाडी मंदिरात दररोज सकाळी ५ दुपारी १२ आणि सायंकाळी ७ वाजता नित्यनेमाने आरती केली जाते मंदिरात दत्त जयंतीनिमित्त भव्य यात्रा भरते तर गोकुळाष्टमीनिमित्तही जन्मोत्सव काला कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते
मंदिराच्या जीर्णोद्धारालाही सुमारे १६ वर्षांपूर्वी सुरुवात झाली असून धार्मिक परंपरेसोबतच बालसंस्कार शिबिरे अंधश्रद्धा निर्मूलन व्यसनमुक्ती आणि विविध समाजप्रबोधनात्मक उपक्रम राबविले जातात पदयात्रांच्या माध्यमातून पंचकृष्ण चरणांकित स्थानांचे वंदन करण्याची परंपराही या उपक्रमांशी जोडली गेली आहे
मंदिरातील धार्मिक पूजाअर्चा महंत हरीव्यासबाबा अंकुळनेरकर व ई श्री कृष्णराज दादा पंजाबी पूज्य तपस्विनी भावनाताई अंकुळेकर यांच्या पुढाकाराने सुरू असून सायगाव उपदेशी मंडळी व ग्रामस्थांच्या सहकार्याने विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रम राबविले जातात
संगीतमय प्रवचनातून ज्ञानामृताचा वर्षाव
सायंकाळी ७ ते ९ या वेळेत मुखेड येथील माधुरीताई रेलकर यांचे संगीतमय प्रवचन होणार आहे. त्यानंतर रात्री १० वाजता भगवान श्री गोविंद प्रभू जन्मोत्सव व भजनसंध्या होणार असून मध्यरात्रीपर्यंत भजन-कीर्तनाच्या स्वरांनी सायगाव फाटा परिसर भक्तिमय होणार आहे
ध्वजारोहणाने उत्सवाचा दुसरा दिवस सुरू
शुक्रवारी 25 सप्टेंबर रोजी सकाळी मंगलमूर्तीचे पूजन व स्नान त्यानंतर श्रीमद्भगवद्गीता पाठ पारायण व नामस्मरण होणार आहे सकाळी ९.३० वाजता प.पू.म.श्री मयंकराज बाबा भरवस फाटा व आमदार पंकजभाऊ भुजबळ यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण होणार आहे
यानंतर धर्मसभा मंडपाचे उद्घाटन व दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम संत-महंतांच्या मंगलमय उपस्थितीत पार पडणार आहे
संतवाणीचा ज्ञानयज्ञ अन् धर्मसभेची पर्वणी
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प.पू.म.श्री आचार्य प्रवर विध्वांस बाबा, कार्याध्यक्ष म्हणून प.पू.म.श्री. आचार्य प्रवर राजधर बाबा संवत्सर तर प्रमुख वक्ते म्हणून प.पू.म.श्री भागवताचार्य चिरडे बाबा निफाड उपस्थित राहणार आहेत
महानुभाव पंथाच्या अध्यात्मिक परंपरेतील विचार भगवान श्री गोविंद प्रभूंचे कार्य भक्तीमार्ग सदाचार आणि मानवतेचा संदेश यावर संत-महंतांच्या वाणीतून विचारमंथन होणार असल्याने धर्मसभा भाविकांसाठी विशेष पर्वणी ठरणार आहे
महाआरतीनंतर महाप्रसाद
दुपारी १२ ते १ या वेळेत महाआरती तर दुपारी १ ते ३ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे श्रींच्या चरणी माथा टेकवून संतवाणीचे ज्ञानामृत घेऊन आणि महाप्रसादाचा लाभ घेऊन भाविकांनी या आध्यात्मिक सोहळ्याचा अनुभव घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे
मंत्री भुजबळांसह मान्यवरांची मांदियाळी
या भव्य जयंती महोत्सवाला मंत्री छगनरावजी भुजबळ यांच्यासह आमदार पंकजभाऊ भुजबळ माजी आमदार मारोतराव पवार ज्येष्ठ नेते अंबादास बनकर माजी आमदार बाळासाहेब सानप शिक्षक आमदार किशोरभाऊ दराडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत
तसेच माजी खासदार समीरभाऊ भुजबळ माणिकराव शिंदे कल्याणराव पाटील दिलीप खैरे राधाकिसन सोनवणे जयदत्त होळकर जल हक्क संघर्ष समितीचे भागवतराव सोनवणे यांच्यासह विविध मान्यवरांचे सहकार्य लाभत आहे
दत्तभूमीपासून गोविंद प्रभूंच्या जयंतीपर्यंत भक्तीचा अखंड धागा
सायगावची पुरातन दत्तभूमी भगवान श्री गोविंद प्रभूंचे श्रद्धास्थान आणि महानुभाव पंथाची अध्यात्मिक परंपरा यांचा अनोखा संगम या जयंती महोत्सवाच्या निमित्ताने अनुभवायला मिळणार आहे त्यामुळे हा सोहळा केवळ दोन दिवसांचा धार्मिक कार्यक्रम न राहता पिढ्यान्पिढ्या जपलेल्या श्रद्धा, संस्कार आणि संतपरंपरेचा उत्सव ठरणार आहे
श्रींच्या चरणी फुलांची उधळण करूया मुखी श्री गोविंद प्रभू चा जयघोष करूया सायगावच्या पावन दत्तभूमीचे दर्शन घेऊया संतवाणीचे ज्ञानामृत घेऊया आणि महानुभाव परंपरेच्या या भक्तिमय सोहळ्याचे साक्षीदार होऊया
पंचक्रोशीतील भाविकांनी सहकुटुंब-सहपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित राहून भगवान श्री गोविंद प्रभू जयंती महोत्सवाची शोभा वाढवावी असे आवाहन समस्त ग्रामस्थ सायगाव येवला तालुका महानुभाव समिती व पंचक्रोशीतील सद्भक्त मंडळींनी केले आहे








