आष्टी तालुक्यात नविन प्रयोग यशस्वी,
टॅनझेरीयन संत्रामधून सेवानिवृत्त प्रा. डॉ. सांगळे यांनी घेतले अडीच लाखाचे उत्पन्न
आष्टी ( दिगंबर बोडखे ):- आवड असेल तर सवड निश्चित मिळते या प्रमाणे कडा येथील सेवानिवृत्त ग्रंथपाल प्रा. डॉ. शाम सांगळे यांनी आपल्या शेतात नविनच प्रयोग करीत दोन एकर टॅनझेरीयन संत्राची उत्कृष्ट शेती करीत पहिल्याच वर्षी अडीच लाख रुपयांचे उत्पन्न घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शासकीय आणि निमशासकीय सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर काय करायचे असा प्रश्न अनेकांसमोर उभा राहतो .कर्मचारी नोकरीतून निवृत्त झाला तरी खऱ्या अर्थाने सेवेतून निवृत्त होत नाही, त्यांना कोणतेही काम करण्याची आवड असेल तर सवड निश्चित मिळते आणि सेवानिवृत्तीनंतरचा वेळही कामात जातो याचे ताजे उदाहरण म्हणजे कडा येथील प्रा. डॉ. शाम सांगळे हे आहेत. कडा येथील आनंदराव धोंडे महाविद्यालयात ते ग्रंथपाल म्हणून कार्यरत होते आपल्याला सेवानिवृत्तीनंतर काय करायचे या प्रश्नाचे उत्तर त्यांनी तीन वर्षांपूर्वीच लिहून ठेवले होते.
सेवानिवृत्तीनंतर आपण उत्कृष्ट अशी शेती करायची हा हेतू समोर ठेवून शेतात पाण्याच्या नियोजनासाठी शेत तलाव करून ठेवला होता. टॅनझेरीयन संत्राची लागवड केली होती तसेच दोन एकर लिंबाची देखील यापूर्वीच लागवड केली होती. तीन महिन्यापूर्वी ते सेवेतून निवृत्त झाले आणि आता ते चांगल्याच प्रकारे शेतात रमले आहेत. आपल्या शेतात त्यांनी तीन वर्षांपूर्वी टॅनझेरीयन या संत्राच्या जातीचे दोन एकर क्षेत्रावर सहाशे झाडांची दहा बाय चौदा अंतरावर लागवड केली होती. ठिबकने पाणी आणि शेणखताचा वापर करीत चांगली काळजी घेतल्याने यावर्षी चांगल्या प्रकारे फळधारणा झाली होती. आष्टी तालुक्यात धामणगाव, कडा, पिंपळगाव दाणी आणि शिरापूर येथील मोजक्या शेतकऱ्यांनी टॅनझेरीयन संत्राची लागवड केली होती.

टॅनझेरीयनचा नविन प्रयोग केला होता. किती प्रमाणात यश मिळते याचा अंदाज नव्हता. धोंडे वाडी या संत्राच्या वाणांची सर्वत्र मोठ्या प्रमाणात लागवड अनेक वर्षांपासून होते. परंतु प्रा. डॉ. शाम सांगळे व इतर चार ते पाच शेतकऱ्यांनी मिळून हा नविनच प्रयोग केला होता आणि तो यशस्वी देखील झाला. यावर्षी लिंबाला देखील चांगला भाव मिळाला होता.टॅनझेरीयन मध्ये लागवडीपासून आंतरपीक म्हणून कांद्याचे पिक घेतले होते. टॅनझेरीयन संत्रा पुणे, मुंबई येथील बाजारपेठेत पाठवण्यात आला. कमीत कमी ४० ते जास्तीत जास्त ९० रुपये किलो पर्यंत दर मिळाला. दोन एकर मधून डॉ. शाम सांगळे यांनी अडीच लाख रूपयांचे उत्पादन घेतले. टॅनझेरीयन संत्राला ग्रामीण भागात मागणी नसली तरी पुणे मुंबई या परिसरात चांगली मागणी आहे. शरीरासाठी पौष्टिक असल्याने लोक आवडीने खातात. प्रा. डॉ. शाम सांगळे, पत्नी सौ. चक्रवर्ती शाम सांगळे, मुलगा शुभम व स्नुषा सौ. अनुजा हे सर्व मिळून शेतात काम करतात.
शरीरासाठी अत्यंत पौष्टिक :- डॉ. सांगळे
टॅनझेरीयन संत्राबाबत डॉ. शाम सांगळे यांनी सांगितले की, धोंडेवाडी संत्रा पेक्षा ट्रानझेरीयन हे आकाराने किंचीत लहान आणि चपटे असते. गडद नारंगी किंवा लालसर नारंगी रंग असतो. इतर संत्रा पेक्षा चविला अतिशय गोड आणि रसाळ असते. सोलण्यास सोपे असते तसेच यामध्ये व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट आणि फायबरचे प्रमाण भरपूर असते त्यामुळे आरोग्य चांगले राहते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते असे हे पौष्टिक फळ आहे.








