शफीक शेख, उपसंपादक, पिंपरी चिंचवड
रुग्णालय परिसरातील अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न; प्रशासनाचे दुर्लक्ष किती दिवस?
पिंपरी, दि. १६ :- पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या (वायसीएम) परिसरात स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. रुग्णालयाच्या परिसरात काही ठिकाणी कचरा व अस्वच्छता दिसून येत असतानाच याच परिसरात खाद्यपदार्थांची दुकाने सुरू असल्याने नागरिकांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त होत आहे.
रुग्णालयात उपचारासाठी येणारे रुग्ण, त्यांचे नातेवाईक, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या प्रमाणात या परिसरात ये-जा करतात. खाद्यपदार्थ विक्रीच्या ठिकाणी स्वच्छता राखणे, खाद्यपदार्थ झाकून ठेवणे, स्वच्छ पाण्याचा वापर करणे आणि कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे आवश्यक असताना परिसरातील अस्वच्छतेकडे संबंधित यंत्रणेचे लक्ष आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
विशेषतः रुग्णालय परिसरात संसर्गाचा धोका लक्षात घेता स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोर पालन होणे गरजेचे आहे. त्यामुळे खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांची नियमित तपासणी करून स्वच्छता व अन्नसुरक्षेच्या नियमांचे पालन होत आहे की नाही, याची प्रशासनाने पाहणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
महापालिका प्रशासनाने केवळ स्वच्छतेच्या सूचना न देता प्रत्यक्ष पाहणी करून दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, तसेच रुग्णालय परिसरात नियमित स्वच्छता मोहीम राबवावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
घाणीच्या परिसरात खाद्यपदार्थ का?
खाद्यपदार्थ विक्रीच्या ठिकाणी स्वच्छता आवश्यक
कचरा व सांडपाण्याची योग्य विल्हेवाट गरजेची
खाद्यपदार्थ झाकून ठेवण्याची आवश्यकता
रुग्णालय परिसरात नियमित तपासणीची गरज
नियमांचे उल्लंघन आढळल्यास कारवाईची मागणी









