पिंपरी चिंचवड शहरात होणार मनोज जरांगे पाटील यांचं भव्य स्वागत
पिंपरी चिंचवडमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी सकल मराठा समाजाची नियोजन बैठक संपन्न
सुनिल एच गायकवाड | पिंपरी चिंचवड
मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील हे लवकरच पिंपरी चिंचवड शहरात येणार असून त्यांच्या भव्य स्वागतासाठी सकल मराठा समाज पिंपरी चिंचवड यांच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक पिंपरी येथे एका तातडीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत शहरातील मराठा समाजातील कार्यकर्ते आणि समन्वयक मोठ्या संख्येने उपस्थित होते
बैठकीत मनोज जरांगे पाटील यांच्या दौऱ्याचे नियोजन स्वागताचा मार्ग व ठिकाण आणि कायदा सुव्यवस्थेचे पालन करत शिस्तबद्ध पद्धतीने हा कार्यक्रम कसा यशस्वी करता येईल यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे व नियोजन:
भव्य स्वागत सोहळा: शहराच्या प्रवेशद्वारावर शुक्रवार दिनांक १८/०९/२०२६ रोजी वेळ दुपारी ३ वाजता स्थळ- भुजबळ चौक हिंजवडी उड्डाण पुलाच्या खाली पुणे बेंगलोर महामार्ग वाकड येथे मनोज जरांगे पाटील यांचे ऐतिहासिक आणि अभूतपूर्व स्वागत करण्याचा निर्णय घेण्यात आला शांततापूर्ण शिस्त: मराठा समाजाची शिस्त आणि शांतता राखत हा दौरा खोपोली पर्यंत यशस्वी करण्याचा निर्धार सर्व वक्त्यांनी आणि समन्वयकांनी व्यक्त केला. अथक पूर्वतयारी: या दौऱ्याची माहिती शहरातील तळागाळातील समाज बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडिया आणि पत्रकांद्वारे व्यापक प्रचार करण्यात यावा असे आवाहन बैठकीत करण्यात आले.
या बैठकीला पिंपरी चिंचवड आणि परिसरातील सकल मराठा समाजाचे आजी-माजी पदाधिकारी, तरुण कार्यकर्ते आणि महिला प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. मनोज जरांगे पाटील यांच्या या दौऱ्यामुळे पिंपरी चिंचवडमधील मराठा समाजात प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे.








