बुद्धांचा धम्म विचारातून आचरणाकडे जाण्याचा मार्ग : भंन्ते सागर बोधी
वर्षावास निमित्त कानडीत ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ ग्रंथाचे अखंड वाचन
मिलिंद इंगळे | जिल्हा प्रतिनिधी अकोला |
मुर्तीजापूर तालुक्यातील कानडी येथे वर्षावास निमित्त ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाचे अखंड वाचन भंन्ते सागर बोधी यांच्या वाणीतून व मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. वर्षावासाच्या निमित्ताने गावात विविध धम्मोपयोगी, शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
भंन्ते सागर बोधी यांच्या मार्गदर्शनाखाली व्यक्तिमत्त्व विकास, लहान मुलांसाठी भाषण स्पर्धा, गीत गायन स्पर्धा आदी उपक्रम घेण्यात येत असून, बालकांपासून युवक-युवतींपर्यंत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग मिळत आहे.
भगवान बुद्धांचा करुणा, प्रज्ञा, समता आणि मानवतावादी विचार समाजापर्यंत पोहोचावा, तसेच नव्या पिढीला बुद्ध धम्माच्या विचारांची ओळख व्हावी, या उद्देशाने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
दरम्यान, बुद्ध धम्माचा ऐतिहासिक वारसा प्रत्यक्ष अनुभवता यावा, यासाठी भंन्ते सागर बोधी यांच्या मार्गदर्शनाखाली अजिंठा आणि वेरूळ येथील जगप्रसिद्ध लेण्यांना धम्मदर्शन सहलीचे आयोजन करण्यात आले. या सहलीमध्ये अबालवृद्ध, महिला-पुरुष तसेच युवक-युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले.
वर्षावासाच्या माध्यमातून केवळ धार्मिक कार्यक्रम न घेता वाचन, चिंतन, प्रबोधन, संस्कार आणि व्यक्तिमत्त्व विकास यांचा सुंदर संगम साधण्यात येत आहे. त्यामुळे कानडी गावात वर्षावास निमित्त धम्ममय वातावरण निर्माण झाले आहे.
या संपूर्ण उपक्रमाचे नियोजन तक्षशिला महिला मंडळ, कानडी व भीम सैनिक मंडळ, कानडी यांच्या वतीने करण्यात आले. तसेच कानडी गावचे माजी सरपंच संघपालजी लांजेवार, संजय भगत आणि दादारावजी रामटेके यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.
वर्षावासाच्या माध्यमातून बुद्धांचे विचार समाजजीवनात रुजविण्यासोबतच ते प्रत्यक्ष आचरणात आणण्याचा संदेश देण्यात येत असून, या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.








