अंबूलगा येथील विकासकामांच्या पारदर्शकतेचा मुद्दा ऐरणीवर
पत्रकारांच्या उपस्थितीत तीन वर्षांतील विकासकामांची कागदपत्रे सादर; प्रत्यक्ष कामांची पाहणी व पडताळणीची मागणी
संगपाल मदने | देगलूरु ता. प्रतिनिधी
देगलूर तालुक्यातील अबुलगा येथील दि.१७ सप्टेंबर २०२६ रोजी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने अंबूलगा येथे आज गावातील विविध विकासकामांच्या पारदर्शकतेबाबत माहिती व प्रत्यक्ष पाहणीचा उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमास तालुक्यातील पत्रकार बांधव उपस्थित होते. यावेळी मागील तीन वर्षांतील विविध विकासकामांची उपलब्ध कागदपत्रांवर आधारित प्राथमिक माहितीपत्रिका पत्रकारांना देण्यात आली.
या माहितीपत्रिकेत विविध विकासकामांचे नाव, काम क्रमांक, प्रशासकीय आदेश, दिनांक, मंजूर निधी, उपलब्ध देयकाची माहिती तसेच संबंधित इतर तपशील देण्यात आले होते. पत्रकारांनी यावेळी उपलब्ध माहितीची पाहणी करून मंजूर निधीच्या तुलनेत प्रत्यक्ष कामाची व्याप्ती, गुणवत्ता, पूर्णत्वाची स्थिती आणि कागदपत्रांतील माहिती व प्रत्यक्ष परिस्थिती यांचा ताळमेळ तपासण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली.
विकासकामांबाबत काही प्रश्न किंवा शंका असल्यास संबंधित सक्षम प्राधिकरणाकडे तक्रार करून चौकशीची मागणी करण्याचा मार्ग स्वतंत्रपणे उपलब्ध आहे. मात्र, आजच्या उपक्रमाचा उद्देश कोणत्याही व्यक्तीविरुद्ध आरोप करणे किंवा स्वतःहून निष्कर्ष काढणे नसून, उपलब्ध कागदपत्रे आणि प्रत्यक्ष परिस्थिती पत्रकारांच्या निदर्शनास आणून देणे व त्यांची स्वतंत्र पत्रकारितेच्या माध्यमातून पडताळणी होणे, हा असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
ग्रामपंचायत कार्यकारिणीने सक्रिय भूमिका बजावावी
ग्रामपंचायतीच्या कार्यकारिणीतील प्रत्येक सदस्याची भूमिका केवळ कागदोपत्री कोरम पूर्ण करण्यापुरती मर्यादित न राहता, गावातील विकासकामांच्या नियोजन, निर्णयप्रक्रिया, प्रत्यक्ष देखरेख आणि कामांच्या गुणवत्तेच्या दृष्टीने सक्रिय सहभागाची असावी, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.
विकासकामांची माहिती ग्रामस्थांना उपलब्ध व्हावी, कामांच्या ठिकाणी आवश्यक माहिती फलक असावेत आणि सार्वजनिक निधीतून होणाऱ्या कामांबाबत नागरिकांना वस्तुनिष्ठ माहिती मिळावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
आजच्या उपक्रमात उपस्थित पत्रकारांनी उपलब्ध माहिती व कागदपत्रांची नोंद घेतली असून, संबंधित विकासकामांची प्रत्यक्ष स्थिती व कागदपत्रांतील माहिती यांची स्वतंत्र पडताळणी करून वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
या उपक्रमा मागे कोणत्याही व्यक्ती, पदाधिकारी किंवा ग्रामपंचायती विरुद्ध पूर्वग्रहदूषित भूमिका नसून, सार्वजनिक निधीचा योग्य विनियोग, विकासकामांची गुणवत्ता आणि ग्रामविकासा तील पारदर्शकता याबाबत जनजागृती व्हावी, हा उद्देश असल्याचे ॲड. अंकुशराजे तुळशीराम जाधव यांनी सांगितले.
कार्यक्रमात योग्य ती खबरदारी घेण्यात आली होती. शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी मरखेल पोलीस ठाण्याचे जमादार पोहेकर यांच्यासह एकूण ४ पोलीस कर्मचारी उपस्थित होते.








