समाज मंदिराच्या कामावर प्रश्नचिन्ह ?
४.७५ लाखांचे बिल रोखण्याची मागणी …
जुनेच काम रंगरंगोटी व छपाई करून नव्याने दाखविल्याचा ग्रामस्थांचा आरोप; चौकशीची मागणी
मिलिंद इंगळे जिल्हा प्रतिनिधी
मुर्तिजापूर तालुक्यातील गट ग्रामपंचायत दापुरा अंतर्गत गुंजवाडा येथे १५व्या वित्त आयोगाच्या निधीतून मंजूर असलेल्या ४ लाख ७५ हजार रुपयांच्या समाज मंदिराच्या कामावर ग्रामस्थांनी गंभीर आक्षेप नोंदविला आहे. सदर समाज मंदिराचे काम यापूर्वीच समाजबांधवांनी पूर्ण केलेले असताना, त्याच जुन्या कामावर केवळ रंगरंगोटी व छपाई करून ते नवीन काम म्हणून दाखविण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होईपर्यंत संबंधित ठेकेदाराचे बिल अदा करू नये, अशी मागणी विशाखा महिला संघ व इतर ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनानुसार, गट ग्रामपंचायत दापुरा अंतर्गत गुंजवाडा येथे पंचायत समिती सदस्यांच्या निधीतून ४ लाख ७५ हजार रुपये (अक्षरी चार लाख पंचाहत्तर हजार रुपये) खर्चून समाज मंदिराचे काम मंजूर करण्यात आले आहे. मात्र, हे समाज मंदिराचे काम यापूर्वीच समाजबांधवांनी पूर्ण केले असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
ग्रामस्थांच्या आरोपानुसार, पूर्वी अस्तित्वात असलेल्या समाज मंदिराच्या कामाची रंगरंगोटी व छपाई करून तेच काम नव्याने करण्यात आल्याचे दाखविण्यात येत आहे. त्यामुळे प्रत्यक्षात नवीन काम झाले आहे की जुन्या कामावर केवळ डागडुजी व रंगरंगोटी करून शासकीय निधीचा वापर केला जात आहे, याची चौकशी होणे आवश्यक असल्याचे ग्रामस्थांनी निवेदनात नमूद केले आहे.
चौकशी पूर्ण होण्यापूर्वी बिल काढल्यास प्रकरण अधिक गंभीर होऊ शकते, त्यामुळे संबंधित कामाची प्रत्यक्ष पाहणी, उपलब्ध कागदपत्रांची तपासणी, कामाचे मोजमाप व मंजूर अंदाजपत्रकानुसार काम झाले आहे का, याची पडताळणी करूनच पुढील कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनाच्या प्रती अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, संबंधित मुख्य कार्यकारी अभियंता तसेच मुर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार यांना देण्यात आल्या आहेत.
ग्रामस्थांपैकी रामेश्वर किर्दक, समाधान इंगळे, माणिक इंगळे, प्रकाश डोंगरदिवे, प्रेमदास डोंगरदिवे, विनायक डोंगरदिवे, रमेश इंगळे, अशोक किर्दक, बाळासाहेब जामनिक, ज्ञानदेव इंगळे यांच्यासह सौ. रेखा प्रकाश डोंगरदिवे, सौ. मंदा चरणदास बरडे, सौ. चंद्रकला रमेश इंगळे, सौ. रंजना विनायक डोंगरदिवे, सौ. शिला प्रेमदास डोंगरदिवे, सौ. निर्मला रामेश्वर किर्दक, सौ. शिला वासुदेव डोंगरदिवे, सौ. रेणुका शंकर डोंगरदिवे, सौ. अनिता गोवर्धन किर्दक, सौ. वंदना अशोक किर्दक, सौ. अनिता बाळू जामनिक, सौ. हिरूबाई समाधान इंगळे, सौ. मंदा माणिक जामनिक, सौ. वंदना साहेबराव डोंगरदिवे आणि सौ. संगीता संजय डोंगरदिवे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
आता प्रशासन या तक्रारीची दखल घेऊन प्रत्यक्ष पाहणी व चौकशी करणार का आणि चौकशीअंती या ४.७५ लाखांच्या कामाबाबत काय निष्पन्न होते, याकडे गुंजवाड्यासह परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.








