भुसावळ पंचायत समितीच्या छताला ताडपत्रीचा आधार.
. चक्रधर महाले | भुसावळ प्रतिनिधी
-भुसावळ येथील ब्रिटिश कालीन नगरपालिका इमारत आणि पंचायत समिती इमारत दोन्ही जीर्ण झाल्या असून नवीन प्रशासकीय इमारतीचा प्रस्ताव टाऊन प्लॅनिंग कडे पाठविला आहे परंतु त्यास अद्यापही मंजुरी मिळाली नाही,असे कळते.73 व्या घटना दुरुस्तीमुळे ग्रामपंचायत,पंचायत समितीला घटनात्मक दर्जा मिळाला असून पंचायत समिती स्तरावरून विविध विकास योजनांचे नियोजन आणि शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाते. एकंदरीत जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील ज्या संस्था आहेत त्या संस्थांवर पंचायत समितीचे नियंत्रण असते परंतु याच कार्यालयाच्या इमारतीची अवस्था अतिशय केविलवाणी झाली आहे. गेल्या साठ वर्षात ब्रिटिश कालीन कौलारू इमारतीचे फक्त कौले बदलून त्यावर सिमेंटचे पत्रे बसवण्यात आली. एवढाच बदल यापूर्वी करण्यात आला आहे. या जीर्ण आणि पावसाळ्यात गळक्या इमारतीमध्ये पंचायत समितीचे प्रशासकीय कामकाज चालते. सिमेंटच्या पत्रावर गेल्या दोन वर्षा पूर्वी पावसाळ्यात ताडपत्री टाकून गळते छत झाकण्याचा केविलवाना प्रयत्न तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आलेला आहे. पावसाळ्यात गळणारे छत, आवरात साचलेले पाणी आणि अस्वच्छ परिसर यामुळे अधिकारी कर्मचारी व ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात गैरसोई चा सामना करावा लागत आहे. ग्रामीण विकासाचा मुख्य आधार असलेल्या पंचायत समितीच्या कार्यालयाकडे वरिष्ठ कार्यालयाचे दुर्लक्ष झाल्याचे चित्र सध्या तरी दिसून येत आहे..मा. नूतन गटविकास अधिकारी डॉ.कुलदीप ठाकरे यांनी नवीन पंचायत समितीच्या इमारतीचा प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर पाठवून पाठपुरावा करावा अशी रास्त अपेक्षा ग्रामीण भागातून करण्यात येतआहे..








