जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आवाहनाला प्रतिसाद
उपळाईत २२०० केशर आंब्यासह तीन हजार रोपांचे वाटप
पत्रकार अमोल मदने
माढा : गणेशोत्सव काळात ज्या गावात किमान एक हजार वृक्षांची लागवड होईल, त्या गावातील गणेश मंडळाच्या आरतीला आपण स्वतः उपस्थित राहू, असे आवाहन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले होते. या अभिनव उपक्रमाची प्रत्यक्ष सुरुवात उपळाई बुद्रुक (ता. माढा) मधून झाली आहे.
उपळाई बुद्रुकचे सुपुत्र तथा आयआरएस अधिकारी स्वप्निल पाटील यांच्या पुढाकारातून आणि भारत फोर्ज व बारामती अॅग्रो यांच्या सीएसआर निधीतून गावासाठी सुमारे ३ हजार रोपे उपलब्ध करून देण्यात आली. विशेष म्हणजे यामध्ये २२०० केशर आंब्याच्या रोपांचा समावेश आहे.
रोपांचे वाटप व वृक्षलागवड कार्यक्रम श्री नंदिकेश्वर विद्यालयाच्या प्रांगणात मंगळवारी (दि. १५) सायंकाळी ४ वाजता पार पडला. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि प्रगतिशील बागायतदार शरद पाटील यांच्या हस्ते रोपांचे वाटप करण्यात आले. शाळा परिसरासह गावातील विविध ठिकाणी वृक्षारोपण करून प्रत्येक रोपाच्या संगोपनाची जबाबदारी विद्यार्थी व नागरिकांवर सोपविण्यात आली.
यावेळी पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनी वृक्षसंवर्धनाचा मंत्र दिला. तसेच उपळाई बुद्रुक येथील गणेश मंडळाच्या गणपतीची आरती केली. कार्यक्रमास उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप, माढा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रोहित शिंदे, कार्यक्रमाचे आयोजक मनोज गायकवाड, दीपक देशमुख, लक्ष्मण जाधव, दत्तात्रय लवटे आदी उपस्थित होते.








