हिप्परगा थडी परिसरात गिट्टी क्रेशरला परवानगी देऊ नका, ग्रामपंचायतीला पत्रकारांचे निवेदन…
मारोती एडकेवार
जिल्हा प्रतिनिधी नांदेड
नांदेड : रेणापूर ते निजामाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी हिप्परगा थडी परिसरात गिट्टी क्रेशर प्लांट उभारण्यासाठी जमीन अधिग्रहणाची हालचाल सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पत्रकार राजेश आमेटवार व पत्रकार मारोती एडकेवार यांनी हिप्परगा थडी ग्रामपंचायतीकडे क्रेशरला परवानगी न देण्याची मागणी केली आहे. याबाबत ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच इनामदार रहेबर रहिमबेग यांना निवेदन देण्यात आले.
रेणापूर–निजामाबाद महामार्ग हा आदमपूर, खतगाव, केसराळी, रामपूर थडी, हिप्परगा थडी, दौलतापूर, सगरोळी, बोळेगाव, येसगी मार्गे निजामाबादकडे जाणार आहे. या महामार्गाच्या कामासाठी विविध ठिकाणी गिट्टी क्रेशर प्लांट उभारण्याची तयारी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
“पर्वतावर क्रेशर बसविल्यास गावाच्या सुरक्षेला धोका”
यावेळी पत्रकार मारोती एडकेवार यांनी सांगितले की, हिप्परगा थडी हे गाव नदी व पर्वताच्या मध्यभागी वसलेले आहे. गावाच्या दक्षिणेला नदी तर उत्तरेला पर्वत आहे. या पर्वतावर ब्लास्टिंग करून क्रेशर प्लांट उभारल्यास पर्यावरणीय तसेच भविष्यातील सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. अतिवृष्टीच्या काळात डोंगराचा भाग खचण्याची किंवा दरडी कोसळण्याची भीती ग्रामस्थांमध्ये आहे.
यापूर्वी कल्याण टोल कंपनीकडून जमीन अधिग्रहण करून ब्लास्टिंग करण्यात आले असून मोठा खड्डा निर्माण झाला आहे. हा खड्डा अद्याप बुजविण्यात आलेला नसल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात अशाच प्रकारे पर्वत परिसरात मोठ्या प्रमाणात उत्खनन व ब्लास्टिंग झाल्यास त्याचा परिणाम गावाच्या सुरक्षिततेवर होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त करण्यात आली.
हिप्परगा थडी ग्रामपंचायतीने ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचा विचार करून गावाच्या हद्दीत गिट्टी क्रेशर प्लांट उभारण्यासाठी कोणतीही परवानगी देऊ नये, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. गरज पडल्यास यासाठी कायदेशीर मार्गाने, लढा दिले जाईल पत्रकार राजेश आमेटवार आणि पत्रकार मारोती एडकेवार उपस्थित होते.








