लाकूड वाहतूक परवान्यासाठी २ हजारांची लाच मागितल्या प्रकरणी वनविभागाचा वनसर्वेक्षक एसीबीच्या जाळ्यात..
उज्वल जैस्वाल | बुलढाणा जि. प्रतिनिधी
बुलढाणा* : दिनांक १६ सप्टेंबर २०२६ रोजी लाकूड वाहतुकीसाठी आवश्यक असलेला ट्रान्झिट पास करून देण्यासाठी दोन (२) हजारांची लाच मागितल्याप्रकरणी बुलढाणा वनविभागातील वनसर्वेक्षक अनिल जगदेव वाघ यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. या प्रकरणी आरोपी लोकसेवकास ताब्यात घेण्यात आले आहे.
तक्रारदार हे सुतारकामाचा व्यवसाय करीत असून, त्यांनी दोन शेतकऱ्यांकडून सागवानाची झाडे खरेदी केली होती. सदर झाडे वनविभागाच्या परवानगीने तोडून लाकूड वाहतूक करण्यासाठी आवश्यक असलेला ट्रान्झिट पास मिळविण्यासाठी त्यांनी वनविभागाकडे अर्ज केला होता. पुढील कार्यवाहीसाठी हा अर्ज बुलढाणा वनविभागाच्या कार्यालयाकडे पाठविण्यात आला होता.
या संदर्भात तक्रारदारांनी बुलढाणा उपवनसंरक्षक कार्यालयातील लोकसेवक अनिल वाघ यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी वाघ यांनी लाकूड वाहतूक परवाना अर्थात ट्रान्झिट पास करून देण्यासाठी लोकसेवक गाडवे यांच्या नावाने दोन २ हजारांची लाच मागितल्याची तक्रार करण्यात आली.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर १६ सप्टेंबर २०२६ रोजी बुलढाणा उपवनसंरक्षक कार्यालयाच्या परिसरात सापळा कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारण्यास आरोपीने नकार दिला; मात्र लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १९८/२०२६ नुसार भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ मधील कलम ७ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपीला १७ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ११.४५ वाजता अटक करण्यात आली.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक भागोजी चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सापळा पथकात पोलीस निरीक्षक रमेश पवार यांच्यासह पोलीस कर्मचारी सहभागी होते. प्रकरणाचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बुलढाणा करीत आहेत.








