टाकळीभान प्रतिनिधी : संदीप जाधव
टाकळीभान येथील घरासमोर पत्र्याचे शेड उभारण्याच्या कारणावरून झालेल्या वादात एका महिलेच्या अंगावर धावून जात झटापट केल्याचा, तसेच तिच्या पतीच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारून जखमी केल्याचा प्रकार गुरुवारी (१७ सप्टेंबर) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडला. याप्रकरणी जयश्री प्रकाश गाडेकर (वय २५, रा. टाकळीभान) यांनी श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार, जयश्री गाडेकर यांच्या घराशेजारी सुनील भोसले यांची मोटार सायकल दुरुस्तीची टपरी असून सदर जागेच्या कारणावरून यापूर्वीही वाद होत असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. गुरुवारी सकाळी सुनील भोसले, विकी भोसले व रॉकी भोसले हे त्यांच्या घरासमोर पत्र्याचे शेड उभारत होते. यावेळी जयश्री यांनी शेड उभारण्यास विरोध केला असता, तिघांनी शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.
यानंतर रॉकी व विकी यांनी त्यांच्या अंगावर धावून येत झटापट केली. या झटापटीत रॉकीने त्यांच्या डाव्या हाताला पिरगळले, तर सुनील भोसले याने उजव्या पायावर लोखंडी रॉडने मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. आरडाओरड ऐकून परिसरातील नागरिकांनी मध्यस्थी करून वाद सोडविला.
घटनेनंतर जयश्री यांनी पती प्रकाश यांना फोन करून माहिती दिली. काही वेळाने प्रकाश गाडेकर व त्यांची आई घटनास्थळी आले. त्यावेळी सुनील भोसले याने प्रकाश गाडेकर यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारल्याने त्यांच्या डोक्याला दुखापत होऊन रक्तस्राव झाल्याचा आरोप आहे. रॉकी भोसले यानेही प्रकाश यांना रॉडने मारहाण करून “तुम्हाला संपवून टाकतो” अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
जखमी प्रकाश गाडेकर यांना त्यांचे मित्र गजानन लोखडे व विनोद रणनवरे यांनी श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या प्रकरणी सुनील जाँकी भोसले, विकी सुनील भोसले व रॉकी सुनील भोसले (रा. कोबडवाडी, टाकळीभान) यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी फिर्यादीने केली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
Related Posts
Add A Comment








