युवतीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा,
ग्रामस्थांचे कडा पोलीस चौकी समोर ठिय्या आंदोलन
दिगंबर बोडखे | आष्टी
कडा शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या १९ वर्षीय तरुणीशी कॅबिन बंद करून अश्लील कृत्य करणाऱ्या डॉ. महेंद्र पटवा यांस २० दिवस उलटूनही अटक न झाल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला आहे. आरोपीला तातडीने बेड्या ठोकण्याच्या मागणीसाठी शहरातील शेकडो संतप्त नागरिकांनी शनिवारी (दि. १९) सकाळी कडा पोलीस चौकीत सुमारे दीड तास ठिय्या आंदोलन केले. येत्या चार दिवसांत आरोपीला अटक न केल्यास कडा शहर बेमुदत बंद ठेवण्याचा आक्रमक पवित्रा नागरिकांनी घेतला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आष्टी तालुक्यातील कडा येथील एका खाजगी रुग्णालयात ३० ऑगस्ट रोजी ही घटना घडली होती. उपचारासाठी आलेल्या भावी शिक्षिका असलेल्या १९ वर्षीय तरुणीला डॉ. महेंद्र पटवा याने केबिनमध्ये बोलावून, दरवाजा आतून बंद करत तिच्याशी अश्लील कृत्य केले होते. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून आष्टी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ७५(१) आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेनंतर झालेल्या मारहाणीत संबंधित डॉ. पटवाचा हात फ्रॅक्चर झाल्याने त्याच्यावर अहिल्यानगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, तब्बल २० दिवस उलटूनही आरोपीला अटक न झाल्याने शहरवासीयांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
शनिवारी सकाळी शेकडो नागरिकांनी पोलीस चौकीत ठिय्या मांडला. प्रशासनाने तात्काळ पावले उचलून आरोपीस गजाआड करावे, अशी मागणी करत चार दिवसांत कारवाई न झाल्यास कडा शहर बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. हे निवेदन परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक भारत पांढरे आणि कडा सहायक पोलीस निरीक्षक नाना सूर्यवंशी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
दरम्यान आंदोलकांची बाजू ऐकून घेत परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक भारत पांढरे यांनी जमावाला शांत केले. येत्या ४ ते ५ दिवसांत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आरोपीला गजाआड केले जाईल,” असे ठोस आश्वासन पोलीस प्रशासनाने दिले. या आश्वासनानंतर नागरिकांनी आपले ठिय्या आंदोलन मागे घेतले. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक नाना सूर्यवंशी, पोलीस हवालदार भाऊसाहेब आहेर, नंदकिशोर सवासे, अमोल नवले, गणेश भुतेकर, भारत गुजर, चंद्रमुनी बनसोडे, विकास जाधव, सद्दाम शेख, महिला अंमलदार मर्जीना शेख यांच्यासह होमगार्ड जवानांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
सोबत फोटो








