बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर २८ सप्टेंबरला पाणी प्रश्नावर मोर्चा : माजी आ. भीमराव धोंडे
आष्टी-पाटोदा-शिरूरच्या सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी गोदावरी-कृष्णा खोऱ्यातील पाणी देण्याची मागणी
दिगंबर बोडखे | आष्टी
आष्टी, पाटोदा आणि शिरूर (कासार) तालुक्यांतील सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा, या मागणीसाठी २८ सप्टेंबर २०२६ रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. गोदावरी व कृष्णा खोरे प्रकल्पातील पाणी योग्य नियोजनाद्वारे या तीन तालुक्यांना उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी माजी आमदार भीमराव धोंडे यांनी केली आहे.
बीडचे जिल्हाधिकारी विवेक जाॅन्सन यांना निवेदन दिल्यानंतर माजी आ. भीमराव धोंडे यांनी हॉटेल अन्विता येथे बुधवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी माजी आ. बाळासाहेब आजबे, महेश सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. अजयदादा धोंडे,पाटोदा तालुका अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दीपक घुमरे, भाऊसाहेब भराटे (आष्टी विधानसभा अध्यक्ष), अशोक साळवे (आष्टी तालुका अध्यक्ष, आरपीआय), नियामत बेग (माजी सभापती), अनिल जायभाये (माजी सभापती), महेश सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन दादासाहेब जगताप , सरपंच ज्ञानेश्वर वाघ , माजी सरपंच बाळासाहेब पवार, भागवत वारे, सुरेश राख, बाबासाहेब ससाणे, महारुद्र खेडकर, दत्ता सातपुते यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
माजी आ. धोंडे यांनी पत्रकार परिषदेत बाेलताना सांगितले की, या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. मोर्चाच्या दिवशी जलसंपदा विभाग, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, गोदावरी खोरे विकास महामंडळ तसेच संबंधित तांत्रिक व प्रशासकीय विभागाच्या सक्षम अधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
२८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत हा मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चातील शिष्टमंडळासोबत संबंधित अधिकाऱ्यांची चर्चा घडवून आणून पाणीप्रश्नावर तातडीने ठोस कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
कमी पावसामुळे चालू खरीप हंगामातील ऊस, सोयाबीन, तूर, मूग, कापूस, उडीद आणि बाजरी या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान देण्याची मागणी आहे. तसेच जनावरांच्या चारा व पाण्यासाठी मोठ्या जनावरास १०० रुपये आणि लहान जनावरास ५० रुपये प्रतिदिन अनुदान थेट खात्यावर वर्ग करावे, अशी मागणीही माजी आमदार भीमराव धोंडे यांनी केली आहे.
आष्टी, पाटोदा आणि शिरूर तालुक्यांना सातत्याने पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. सिंचना अभावी शेतीचे प्रश्न गंभीर झाले आहेत. पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या पाण्याचीही अडचण निर्माण होत आहे.
शेतकऱ्यांना मदतीची मागणी
खरीप पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक संकटात आहेत. बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान देण्याची मागणी आहे. पशुधनाच्या चारा व पाण्यासाठीही प्रतिदिन मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे.
सक्षम अधिकाऱ्यांशी चर्चा
२८ सप्टेंबरच्या मोर्चा वेळी जलसंपदा विभाग आणि संबंधित महामंडळांच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे. शिष्टमंडळा सोबत चर्चा करून मागण्यांवर ठोस कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
भीमराव धोंडे, माजी आमदार
तालुक्यांना शाश्वत पाण्याची गरज :- माजी आ. बाळासाहेब आजबे
आष्टी, पाटोदा आणि शिरूर (कासार) तालुक्यांतील पाणी प्रश्न हा केवळ आजचा प्रश्न नसून या भागाच्या भवितव्याशी निगडित आहे. सिंचनासाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी या तालुक्यांना शाश्वत पाण्याची गरज आहे. गोदावरी आणि कृष्णा खोऱ्यातील शिल्लक पाणी या दुष्काळग्रस्त भागाला मिळण्यासाठी शासनाने ठोस निर्णय घ्यावा. पाणी प्रश्नाच्या कायमस्वरूपी सोडवणुकीसाठी २८ सप्टेंबरच्या मोर्चात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.








