मनोज जरांगे पाटील यांच्या रॅलीत डी . जे. वाजवल्याने डी.जे.मालकावर गुन्हा दाखल…
बीड (प्रतिनिधी): मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने अंतरवाली सराटी ते मुंबई निघालेल्या रॅली मध्ये विनापरवाना डीजे वाजवल्याने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
बीड शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात असतानाच छत्रपती शिवाजी महाराज चौकात परवानगीविना डीजे वाजवून १०० पेक्षा अधिक जणांचा जमाव जमवल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी डीजे चालक अक्षय रमेश दाईगडे (रा. नेकनूर, ता. जि. बीड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस हवालदार सुदर्शन रघुनाथ ठोसर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १५ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ८.१० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या पश्चिम बाजूस पोलिसांचा बंदोबस्त सुरू होता. त्यावेळी कन्हैय्या ७/१२ नेकनूरवाला डी.जे. (वाहन क्रमांक MH-42-B-9677) वर मोठ्या आवाजात संगीत सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या संगीतावर १०० पेक्षा अधिक लोक नाचत असल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
पोलिसांनी डीजे चालकाकडे ध्वनिक्षेपक वाजविण्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्याची परवानगी आहे का?याची विचारणा केली. मात्र, संबंधिताने कोणतीही वैध परवानगी सादर केली नसल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. त्यानंतर जमाव.बंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली.
या प्रकरणी कलम २२३ बीएनएस, महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम १३५, १३१ तसेच ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २००० मधील कलम ५(१), ५(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी उपस्थित पोलिस अधिकारी, अंमलदार व इतर साक्षीदारांच्या जबाबांसह उपलब्ध फोटोच्या आधारे घटनेची पुष्टी होत असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.मराठा आरक्षणाच्या रॅलीच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात बंदोबस्तात असताना परवानगीविना डीजे वाजवून गर्दी जमविण्याचा प्रकार घडल्याने पोलिसांनी संबंधितावर कायदेशीर कारवाई केली आहे.








