फार्मसीच्या विद्यार्थ्यांचा पोस्टर स्पर्धेतून नावीन्यपूर्ण कल्पनांचा आविष्कार..!
बाभूळगाव : एस.एन.डी. फार्मसी महाविद्यालयात ९२ विद्यार्थ्यांचा सहभाग,६ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड
लक्ष्मण घुगे | राजापूर प्रतिनिधी
संशोधनाची जिज्ञासा, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि नावीन्यपूर्ण कल्पनांना कृतीची जोड देत बाभूळगाव येथील एस.एन.डी. कॉलेज ऑफ फार्मसी येथे विद्यार्थ्यांनी विविध संशोधन संकल्पना पोस्टरच्या माध्यमातून प्रभावीपणे सादर केल्या.
यातून विद्यार्थ्यांच्या विविध कल्पनांचा आविष्कार पहावयास मिळाला.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहकार्याने आयोजित महाविद्यालयीन स्तरावरील आविष्कार संशोधन स्पर्धेत डी. फार्म., बी. फार्म. आणि फार्म. डी. अभ्यासक्रमातील तब्बल ९२ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या स्पर्धेतून पदवीपूर्व व पदव्युत्तर गटातील प्रत्येकी तीन अशा सहा विद्यार्थ्यांची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.
सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. विद्यार्थ्यांनी विविध विषयांवरील नावीन्यपूर्ण संशोधन संकल्पना पोस्टर सादरीकरणातून मांडल्या. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्जनशीलता, चिकित्सक विचारसरणी आणि समस्या सोडविण्याच्या क्षमतेचे दर्शन घडविण्याची संधी मिळाली.महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. अमोल गायके यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
सादर करण्यात आलेल्या संशोधन पोस्टर्सचे परीक्षण प्रा. डॉ. भास्कर आहेर व प्रा. डॉ. सचिन आगलावे यांनी केले. संशोधनाची गुणवत्ता, नावीन्यता, वैज्ञानिक दृष्टिकोन, विषयाची मांडणी आणि सादरीकरणाची प्रभावीता या निकषांवर पोस्टर्सचे मूल्यमापन करण्यात आले.
शैक्षणिक विभाग प्रमुख प्रा. विकास शिंदे तसेच
शैक्षणिक संशोधन समन्वयक प्रा. रामदास दराडे, आविष्कार समन्वयक प्रा. सयाली पागिरे, प्रा. मनोज गरड व प्रा. महेंद्र वरपे यांनी नियोजन व समन्वय केले.
स्पर्धेच्या समारोपप्रसंगी बक्षीस वितरण व समारोप समारंभ झाला. विजेत्या विद्यार्थ्यांसह सर्व सहभागी विद्यार्थ्यांना उत्स्फूर्त सहभागाबद्दल प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. विभागीय स्तरावरील आविष्कार संशोधन स्पर्धेसाठी निवड झालेल्या सहा विद्यार्थ्यांचे यावेळी अभिनंदन करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या संशोधनवृत्तीला चालना देतानाच नावीन्यपूर्ण कल्पनांना व्यासपीठ देणाऱ्या या उपक्रमामुळे महाविद्यालयात संशोधन संस्कृती व नवोपक्रमाची वृत्ती रुजण्यास हातभार लागल्याचे प्राचार्य डॉ.गायके यांनी सांगितले. या उपक्रमाचे कौतुक करत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे आमदार किशोर दराडे, युवा नेते कुणाल दराडे, संस्थेचे संचालक रुपेश दराडे,प्रशासकीय अधिकारी समाधान झाल्टे,समन्वयक सुनील पवार आदींनी अभिनंदन केले.
फोटो
बाभूळगाव : एस.एन.डी. कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये आविष्कार स्पर्धेसाठी उपस्थित प्रमुख पाहुणे व परीक्षक.








