७० व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भव्य राज्यस्तरीय निबंध स्पर्धा
‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ व ‘शूद्र पूर्वी कोण होते?’ या ग्रंथांवर आधारित वैचारिक उपक्रम
बातमी सम्राट | सुनिल एच गायकवाड | पुणे | दि.२३/०९/२६/
‘आम्ही भारताचे लोक – आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ’ (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने ७० व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भव्य राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ आणि ‘शूद्र पूर्वी कोण होते?’ या दोन महत्त्वपूर्ण ग्रंथांवर आधारित ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या दोन्ही ग्रंथांचे वाचन करून त्यातून मिळालेला वैचारिक अनुभव, स्वतःचे आकलन व स्वानुभव निबंधाच्या माध्यमातून मांडणे, वाचनाची गोडी निर्माण करणे तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
या उपक्रमाची संकल्पना चळवळीच्या कोअर टीम सदस्या तथा प्रसिद्ध कवयित्री-लेखिका आयु. स्वातीताई चव्हाण यांनी मांडली असून, त्यांनी स्पर्धेचे संपूर्ण नियोजन करून त्याचा ड्राफ्ट सांस्कृतिक विभागाकडे सुपूर्द केला आहे. तसेच स्पर्धकांना दोन्ही ग्रंथांच्या पीडीएफ उपलब्ध करून देण्याची जबाबदारीही त्यांनी स्वीकारली आहे. स्पर्धेच्या नियोजन व अंमलबजावणीत कोअर टीम सदस्य पप्पू रोडे, अंकुश सोनवणे, रिता रामटेके, ॲड. प्रियंका गायकवाड आणि विराज निकम यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभत आहे.
सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून डॉ. अविनाश मनवर, आयु. सुनंदा साबळे आणि आयु. वैशाली देठे यांच्या सहकार्याने ही स्पर्धा राबविण्यात येत आहे. चळवळीचे मुख्य समन्वयक संदेश शालिनी संभाजी कर्डक यांनी या वैचारिक उपक्रमाचे स्वागत करून राज्यभरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. दरम्यान, राज्य प्रसिद्धी व जनसंपर्क प्रमुख तथा नांदेड जिल्हा समन्वयक (प्रभारी) संघशिल नवनाथ भद्रे उर्फ एस. एन. नांदेडकर यांनी या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेची माहिती वार्ताहरांशी दिली असून, अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्याचे वाचन, चिंतन आणि वैचारिक प्रसार करावा, असे आवाहन केले आहे.








