शेतकऱ्यांनो घाबरू नका, सरकार तुमच्या पाठीशी आहे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
लवकरच कोरडा दुष्काळ जाहीर करू दिले आश्वासन !
बातमी सम्राट | चंदन जंजाळ | बाळापूर तालुका प्रतिनिधी | दि.२३/०९/२६/
राज्यात पावसा अभावी खरीप पिके करपल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री नाम.एकनाथ शिंदे यांनी काल २२ सप्टेंबर रोजी अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्याशी चर्चा करून विदर्भातील पावसाअभावी नुकसान झालेल्या शेतीची तातडीने माहिती घेऊन पाहणी करण्याचे निर्देश दिले.
त्यानुसार आज २३ सप्टेंबर रोजी अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील दोन गावांची पाहणी करण्यात आली. दुपारी ३ वाजता दधम येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतशिवाराची पाहणी करून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
यावेळी त्यांनी , “शेतकऱ्यांनो घाबरू नका, सरकार त्यांच्या पाठीशी आहे. लवकरच कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू.” येत्या सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याला शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सरकारपर्यंत पोहोचविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे,” असेही शिंदे यांनी सांगितले.
यानंतर उपमुख्यमंत्री व्याळा येथे दुष्काळसदृश परिस्थितीतील शेतीची पाहणी करण्यासाठी रवाना झाले. यावेळी कृषिमंत्री दत्ता मामा भरणे, पालकमंत्री तथा कामगार मंत्री आकाश फुंडकर, खासदार अनुप धोत्रे, आमदार संजय राठोड, माजी आमदार नारायण गव्हाणकर यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दुष्काळग्रस्त शेतीच्या पाहणीची जबाबदारी बाळापूरचे उपविभागीय अधिकारी डॉ. संतोष येवलीकर, तहसीलदार इंजि. वैभव फरतारे आणि गटविकास अधिकारी दीपक सवडे यांनी पार पाडली. तसेच पोलिस बंदोबस्ताची जबाबदारी बाळापूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन पडधन आणि ठाणेदार प्रकाश झोडगे यांनी सांभाळली.








