शेतकरी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या भेटीला!…
बातमी सम्राट || मार्कंडेय सिरमवार | किनवट तालुका आणि | दि.२३/०९/२६/
किनवट व माहूर तालुक्यात यंदा अत्यल्प पाऊस झाल्यामुळे सोयाबीन व कापूस पिके धोक्यात आली असून, शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष रमेश कदम पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकाऱ्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपविभागीय अधिकाऱ्यांची भेट होऊ शकली नाही. जिल्हाध्यक्ष रमेश कदम पाटील यांच्या नेतृत्वात विविध गावातून 50 किलो मीटरहून अधिक प्रवास करून जवळपास 70 पेक्षा अधिक मोटर सायकल व दीडशे पेक्षा अधिक शेतकऱ्यांची रॅली किनवट येथे आली होती.
किनवट व माहूर तालुके प्रामुख्याने सोयाबीन व कापूस उत्पादनावर अवलंबून आहेत. सिंचनाची पुरेशी सुविधा नसल्याने बहुतांश शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने पिकांवर मोठे संकट निर्माण झाले आहे. काही भागात सोयाबीनच्या हिरव्या शेंगांनाच मोड फुटल्याचे संघटनेने निदर्शनास आणून दिले.
दरम्यान, अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी ‘पोटखराब’ म्हणून नोंद झाल्याने तसेच भोगवटादार वर्ग-२ जमिनीच्या नोंदीमुळे फार्मर आयडी मिळण्यात अडचणी येत आहेत. फार्मर आयडीअभावी कर्जमाफीसाठी आवश्यक केवायसी, पीककर्ज, खत वितरण, विविध शासकीय अनुदाने तसेच पीएम-किसान योजनेचा लाभ घेता येत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.
शेतात जाण्यासाठी रस्ते, शेतीसाठी वीज व सिंचन सुविधा उपलब्ध करून देणे, शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर प्रशासनाने तातडीने निर्णय घेणे, तसेच तलाठी कार्यालयांमध्ये लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत सेवा हमी फलक लावणे, अशीही मागणी संघटनेने केली.
याशिवाय पंचायत समिती स्तरावर घरकुलाच्या बिलांसाठी कथित पैशांची मागणी होत असल्याच्या तक्रारी असून, या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी संघटनेने केली आहे.
या सर्व प्रश्नांबाबत तहसीलदारांना यापूर्वी अनेक निवेदने देण्यात आली आहेत. प्रशासनाकडून ठोस कार्यवाही न झाल्यास २८ सप्टेंबर रोजी इस्लापूर येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
“प्रशासनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक भूमिका घेऊन आंदोलनाची वेळ येऊ नये, अशी आमची अपेक्षा आहे. त्यासाठीच पुन्हा एकदा अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला,” असे रमेश कदम पाटील यांनी सांगितले.
उपविभागीय अधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर संघटनेच्या प्रतिनिधींनी पुन्हा तहसीलदारांची भेट घेऊन प्रश्नांवर तातडीने बैठक घेऊन तोडगा काढण्याची विनंती केली. यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून लवकरच कळविण्यात येईल, असे तहसीलदारांनी सांगितल्याची माहिती रमेश कदम पाटील यांनी दिली.








