बडनेऱ्यात ‘पत्रकार भवन’च्या दिशेने आणखी एक पाऊल !
आमदार रविभाऊ राणांच्या २५ लाखांच्या घोषणेनंतर जागेची पाहणी;
आमदारांच्या आदेशाने अविनाश काळें कडून नवी वस्तीतील संभाव्य जागेची पाहणी !
| बातमी सम्राट | अविनाश गोंडाणे | अमरावती | दि.२३/०९/२६/
अमरावती : बडनेरा शहरातील पत्रकारांसाठी स्वतंत्र व सुसज्ज ‘पत्रकार भवन’ उभारण्याच्या मागणीला आता प्रत्यक्ष कार्यवाहीची जोड मिळाली आहे. संयुक्त पत्रकार संघ, बडनेरा यांच्या मागणीवरून बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रविभाऊ राणा यांनी पत्रकार भवनासाठी २५ लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली होती. तसेच नवी वस्ती, बडनेरा येथे आवश्यक जागेची पाहणी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर आमदार रविभाऊ राणा यांचे कार्यालय प्रमुख व स्वीय सहाय्यक अविनाश काळे यांनी बुधवार, दि. २३ सप्टेंबर २०२६ रोजी नवी वस्ती परिसरात पत्रकार भवनासाठी संभाव्य जागेची पाहणी केली. यावेळी पत्रकार भवनासाठी आवश्यक जागा, परिसराची उपलब्धता तसेच पत्रकार व प्रसारमाध्यमांच्या विविध गरजा लक्षात घेऊन जागेची पाहणी करण्यात आली.
बडनेरा शहरातील पत्रकारांसाठी स्वतंत्र पत्रकार भवन उभारल्यास पत्रकार परिषदा, बैठका, चर्चासत्रे, प्रशिक्षण उपक्रम, संदर्भ वाचनालय तसेच डिजिटल मीडिया आणि इतर पत्रकारिता-संबंधित उपक्रमांसाठी कायमस्वरूपी सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
या पाहणीप्रसंगी संयुक्त पत्रकार संघाचे अध्यक्ष सिद्धार्थ बनसोड, उपाध्यक्ष मो. शोएबउद्दीन, सचिव मंगेश चौहान, सहसचिव विशाल उर्फ अविनाश गोंडाणे, कोषाध्यक्ष मुख्तार अहमद, सदस्य मछिंद्र भटकर, सादिक शाह, संजय पंड्या, मो. एहतेशाम सरवर, अ. शफिक शेख, विलास वाडेकर,सतीश भालेराव यांच्यासह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
आमदार रविभाऊ राणा यांनी केलेल्या २५ लाखांच्या निधी घोषणेनंतर जागेच्या पाहणीची प्रक्रिया सुरू झाल्याने पत्रकार भवनाच्या उभारणीच्या मागणीला आता पुढील टप्प्यात जाण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
अविनाश गोंडाणे, अमरावती 9923264193








