संध्याराणी ठरली रामतीर्थ ची पहिली ‘एमबीबीएस’ डॉक्टर !
आई-वडिलांचे स्वप्न साकार; नीटमध्ये ५९५ गुण, मुंबईतील लोकमान्य टिळक मुन्सिपल मेडिकल कॉलेजात प्रवेश
बातमी सम्राट | गंगाधर कांबळे. | बिलोली तालुका प्रतिनिधी | दि.२३/०९/२६/
जिद्द, मेहनत आणि चिकाटीला यशाची साथ मिळाली की ग्रामीण मातीतूनही स्वप्नांना मोठी भरारी घेता येते, हे बिलोली तालुक्यातील रामतीर्थच्या संध्याराणी यादवराव वाडेकर हिने सिद्ध करून दाखवले. आई-वडिलांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न मनाशी बाळगत तिने केलेल्या अथक परिश्रमाला अखेर यश मिळाले. जूनमध्ये झालेल्या नीट परीक्षेत ५९५ गुण मिळवत तिने मुंबईतील लोकमान्य टिळक मुन्सिपल शासकीय मेडिकल कॉलेजात एमबीबीएस अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवला आहे. त्यामुळे रामतीर्थ गावातून एमबीबीएस डॉक्टर होण्याच्या दिशेने वाटचाल करणारी ती पहिली विद्यार्थिनी ठरली आहे.
संध्याराणीच्या एमबीबीएस प्रवेशामुळे रामतीर्थच्या शैक्षणिक वाटचालीत नवा अध्याय जोडला गेला असून, गावच्या मातीत रुजलेले स्वप्न आता मुंबईच्या वैद्यकीय महाविद्यालयात आकार घेत आहे. परंतु संध्याराणीला मागील वर्षीच्या नीट परीक्षेत अपेक्षित यश मिळाले नव्हते. मात्र, अपयशाने खचून न जाता तिने अभ्यासातील उणिवा शोधल्या आणि नव्या जिद्दीने पुन्हा तयारीला सुरुवात केली. सातत्यपूर्ण अभ्यास, मेहनत आणि ध्येयावरची निष्ठा यामुळे यंदा तिने ५९५ गुणांची मजल मारली. ग्रामीण भागातून सुरू झालेला तिचा हा प्रवास आता मुंबईतील नामांकित महाविद्यालयापर्यंत पोहोचला आहे. विशेष म्हणजे तिने जेइई मेन्स परीक्षेत सुद्धा ९३.९० पर्सेंटाइल मिळवले आहेत.
९२ .२० टक्के दहावी, बारावीत ८५.८३ टक्के
संध्याराणीचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण धर्माबाद येथील ग्रीन फिल्ड नॅशनल स्कूलमध्ये झाले. शंकरनगर येथील गोदावरी मनार पब्लिक स्कूलमधून तिने उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. दहावीत ९२.२० टक्के, तर बारावीत ८५.८३ टक्के गुण मिळवत तिने शैक्षणिक गुणवत्ताही कायम राखली.
आई योगेश्वरी गृहिणी असून, वडील यादवराव वाडेकर हे धर्माबाद येथील युनायटेड स्क्रिट लिमिटेड कंपनीत बीसीएस ऑपरेटर म्हणून कार्यरत आहेत. साध्या कुटुंबातून आलेल्या संध्याराणीने आपल्या मेहनतीच्या बळावर वैद्यकीय शिक्षणाच्या दिशेने घेतलेली ही झेप परिसरातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. तिच्या या यशामुळे रामतीर्थसह परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत असून, भविष्यात गावची पहिली एमबीबीएस डॉक्टर म्हणून संध्याराणीचे नाव अभिमानाने घेतले जाणार आहे.








