वरोरा-भद्रावती तालुका कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करा
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन..
बातमी सम्राट | समीर बल्की | तालुका प्रतिनिधी चिमुर | दि.२५/०९/२६/
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा व भद्रावती तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात पावसाचे अपुरे प्रमाण तसेच पावसातील मोठे खंड यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांवर गंभीर परिणाम झाला आहे. अनेक भागात जमिनीतील ओलावा कमी झाला असून कापूस, सोयाबीन, तूर, धान व इतर खरीप पिकांची वाढ खुंटली आहे. काही ठिकाणी पिके सुकण्याच्या अवस्थेत असल्याने वरोरा व भद्रावती तालुके कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करावेत, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने करण्यात आली.
याबाबत उपविभागीय अधिकारी, वरोरा यांना पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले. या निवेदनात वरोरा व भद्रावती तालुक्यातील सर्व गावांची तातडीने संयुक्त पाहणी करून पर्जन्यमान, पावसातील खंड, जमिनीतील ओलावा, पिकांची सद्यस्थिती, पिकांचे नुकसान, जलसाठे व भूजलस्थिती यांचा वस्तुनिष्ठ आढावा घेण्याची मागणी करण्यात आली.
महसूल व कृषी विभागामार्फत गावनिहाय पिकांचे पंचनामे तातडीने करावेत, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार पीक नुकसान भरपाई व आपत्ती मदत मिळावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
तसेच शेतकऱ्यांना लागू असलेल्या कर्ज, वीज, पाणी व इतर शासकीय सवलती उपलब्ध करून द्याव्यात, जनावरांसाठी चारा व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी आणि दुष्काळी परिस्थितीचा गावनिहाय अहवाल तयार करून तो जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांच्याकडे तातडीने सादर करावा, अशी मागणी करण्यात आली.
शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धवसाहेब ठाकरे व युवासेना प्रमुख श्री. आदित्यसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार, तसेच लोकसभा संपर्क प्रमुख श्री. प्रशांतदादा कदम व जिल्हाप्रमुख श्री. भास्करभाऊ ताजणे यांच्या मार्गदर्शनाखाली, उपजिल्हाप्रमुख वरोरा-भद्रावती श्री. अमित भा. निब्रड यांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आले.
यावेळी श्री. बंडुजी डाखरे, विधानसभा प्रमुख; श्री. अतुल नांदे, वरोरा शहरप्रमुख; श्री. आशिष रणदिवे तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर होत असताना प्रशासनाने केवळ कार्यालयीन आकडेवारीवर अवलंबून न राहता प्रत्यक्ष शेतपातळीवर पाहणी करून वस्तुस्थितीचा अहवाल तयार करावा आणि वरोरा व भद्रावती तालुक्यांना कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी शासनाकडे तातडीने प्रस्ताव पाठवावा, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.








